इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीच्या आईने आपल्या सुनेविरुद्ध पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केल्याचे समजते. त्यावरून नवाजुद्दीनची दुसरी पत्नी आलिया हिला वर्सोवा पोलिसांनी सोमवारी चौकशीसाठी समन्स बजावले. ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली आहे. तर घरात झालेल्या किरकोळ वादावरून नवाजुद्दीनच्या आईने हे पाऊल उचलले असे सांगितले जात असले तरी त्याला घरातील संपत्तीच्या वादाची किनार असल्याची चर्चा आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाजुद्दीनच्या वर्सोवा येथील बंगल्यात आलिया गेली होती. त्यावेळी तिथे मेहरुन्निसा या उपस्थित होत्या. उभयतांमध्ये अनेक वर्षांपासून संपत्तीच्या मुद्यावरून वाद सुरू आहे. त्यावरूनच दोघींमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे आलियाविरोधात मेहरुन्निसा यांनी वर्सोवा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आलियाविरोधात गुन्हा दाखल करून तिला चौकशीसाठी समन्स बजावले आहे.
दरम्यान, यासंदर्भात आलियाने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली. त्यात मी माझ्या पतीच्या घरात प्रवेश केला आणि काही तासातच माझ्याविरुद्ध एफआयआर दाखल केला जातो. मला कधी न्याय मिळेल का, असा प्रश्न आलियाने उपस्थित केला. आलियाने ६ मे २०२० रोजी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु २०२१ मध्ये तिने तो निर्णय मागे घेतला. यामागचे प्रमुख कारण म्हणजे कोविड दरम्यान नवाजुद्दिनने तिची काळजी घेतली होती आणि त्यामुळे त्यांच्यातील मतभेद दूर ठेवण्याचे तिने ठरविले होते.
Actor Nawazuddin Siddiqui Wife Police Summons