इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील मनोरंजन हे घरोघरी लोकप्रिय असतं. घराघरातील महिलांच्या मालिका पाहण्याच्या वेळा ठरलेल्या असतात. आतापर्यंत छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणून ‘झी मराठी’ वाहिनीची चर्चा असायची. पण, आता मात्र, झी सोबतच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीची देखील चर्चा होताना दिसते. मालिकांचे नवनवीन विषय हाताळत या वाहिनीने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.
मराठी मालिका विश्वात ‘स्टार प्रवाह’ वाहिनीच्या मालिकांची चांगलीच चर्चा रंगते आहे. या वाहिनीवरील मालिका कायमच टीआरपीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असल्याचे पाहायला मिळते. या वाहिनीने देखील इतर वाहिन्यांच्या धर्तीवर पुरस्कार सोहोळा भरविण्यास सुरुवात केली आहे. यंदाचा स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्त ‘आई कुठे काय करते’ मालिका फेम अभिनेते मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यातून त्यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत.
‘आई कुठे काय करते’ ही मालिका अत्यंत लोकप्रिय आहे. त्यामुळेच यातील सगळे कलाकार प्रेक्षकांच्या अत्यंत आवडीचे आहेत. यात अनिरुद्ध ही व्यक्तिरेखा साकारणारे मिलिंद गवळी हे मालिकेत खलनायक असले तरी सोशल मीडियावर लोकप्रिय आहेत. मिलिंद गवळी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. इन्स्टाग्रामद्वारे फोटो – व्हिडीओ पोस्ट करत असतात. ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार’ सोहळ्यानिमित्ताने नुकतीच त्यांनी एक पोस्ट केली आहे. या कार्यक्रमात मालिकेतील कलाकारांचे नृत्य बघता येणार आहे. या पोस्टमध्ये मिलिंद गवळी यांनी या पुरस्कार सोहळ्याच्या रिहर्सलचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ते ‘सर्वोत्कृष्ट खलनायक’ पुरस्काराबद्दल बोलताना दिसत आहेत.
स्टार परिवार हे जे म्हटलं जातं, ते खरंच तसं असल्याचं मिलिंद गवळी यांचं म्हणणं आहे. मी आजवर दूरदर्शन पासून अनेक खासगी वाहिनात्यांसाठी काम केलेलं आहे. मालिकांच्या वेगवेगळ्या सोहोळ्यात तुमचा सहभाग असतो. तेव्हा कलाकारांना चांगली वागणूक मिळेलच याची खात्री नसते. पण, स्टार प्रवाहसोबत काम करताना हा अनुभव कधीच येत नाही. स्टार प्रवाहच्या सोहळ्यामध्ये ‘स्टार प्रवाह’चे मोठे पदाधिकारीसुद्धा आपल्या कुटुंबाचा किंवा आपल्या परिवाराचा कार्यक्रम आहे, किंवा आपल्या घरचा कार्यक्रम आहे, बालकलाकारांपासून जेष्ठ कलाकार हे आपले पाहुणे आहेत किंवा आपल्या परिवाराचे सदस्य आहेत अशाच पद्धतीने आपुलकीने आणि आदराने स्वागत होते. एवढ्या मोठ्या वाहिनीने आपल्याला त्यांच्या परिवाराचा सदस्य मानलं आहे. परिवाराच्या एका सदस्याप्रमाणे आपल्याला आदराने आणि प्रेमाने वागणूक दिली जाते, यातच मी भरून पावतो. त्या वाहिनी बद्दल आणि त्यांच्या टीम बद्दल माझ्या मनामध्ये खूप आदर आहे, असेही मिलिंद गवळी सांगतात. हे सगळं सांगतानाच १९ तारखेला हा पुरस्कार सोहोळा बघण्याचे आवाहन प्रेक्षकांना करायला विसरत नाहीत.
‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते मिलिंद गवळी हे कायमच चर्चेत असतात. या मालिकेमुळेच ते घराघरात पोहोचले. सध्या ही मालिका टीआरपीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. सध्या या मालिकेत वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत.
Actor Milind Gawali Post Viral Award Ceremony