मुंबई – मराठी चित्रपट सृष्टीतील नामवंत अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनाने निधन झाले आहे. ठाणे येथील एका हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.
किशोर नांदलस्कर यांनी आत्तापर्यंत सुमारे ४० नाटके, २५ हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपट आणि २० हून अधिक मालिकांमधून काम केले. त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या होत्या. त्यांनी १९६०-६१ मध्ये सुमारास ‘आमराई’ या नाटकात काम केले. हेच त्यांचं पहिलं नाटक ठरले. त्यानंतर त्यांनी ‘विठ्ठल फरारी’, ‘नथीतून मारला तीर’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ अशा नाटकांमधून काम केले. १९८० च्या सुमारास ते दूरदर्शनच्या ‘गजरा’, ‘नाटक’ अशा कार्यक्रमांमध्येही सहभागी झाले.
बॉलिवूडमध्येही चमक
किशोर नांदलस्कर यांनी हिंदी चित्रपटांमध्येही उल्लेखनीय भूमिका साकारली होती. वास्तव या चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी जिस देश में गंगा रहता है, तेरा मेरा साथ है, खाकी या चित्रपटांमध्ये काम केले. त्यातबरोबर चाल जाई पर वचन न जाए, ये तेरा घर ये मेरा घर, हलचल, सिंघम या चित्रपटांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित केले होते.
हलाखीची स्थिती
किशोर नांदलस्कर भोईवाडा-परळ येथे पूर्वी राहात होते. त्यांचे घर छोटे असल्यामुळे ते देवळात झोपायचे. जवळपास दीड वर्षे त्यांनी मंदिराचा आसरा घेतला होता. सरकारी दरबारी फेऱ्या मारूनही नांदलस्कर यांना घर मिळत नव्हते. अखेर त्यांनी एका मंदिरात आसरा घेतला. त्यातच त्यांना कोरोनाची बाधा झाली. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले पण अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.