पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सुमारे दिड महिन्यापूर्वी मराठी चित्रपट विश्वात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली होती, ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले होते. रविंद्र यांचा मृतदेह घरातच होता.२ दिवसानंतर शेजाऱ्यांना वास आला आणि त्यांनी पोलीसांकडे तक्रार केली. शेवटी पोलीसांनी दार तोडल्यावर रविंद्र महाजनी आत मृतावस्थेत आढळले होते. ते पुण्यातील तळेगाव दाभाडे मधील आंबी येथे भाड्याच्या घरात महाजनी राहत होते. त्यांचा मृतदेह येथील बंद फ्लॅटमध्ये मिळून आला कारण मृत्युच्या आधी ७-८ महिन्यांपासून या ठिकाणी एकटेच राहत होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा व पत्नीवर टीका होत होती. आता त्यांचा मुलगा व अभिनेता गश्मीरने वडिलांच्या निधनाचे कारण मित्र म्हणे या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.
नेमके काय घडले
रविंद्र महाजनी यांचे निधन कार्डियाक अरेस्टने झाले होते, तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की, तुम्ही तिथे असता तरी काहीच करू शकला नसता, असे गश्मीर महाजनीने सांगितले. सुमारे २०ते२५ वर्षे ते एकटेच राहत होते. मात्र आधी ते मुंबईला येऊन आमच्याबरोबर राहायचे, पण मागच्या साडेतीन वर्षांपासून त्यांनी सर्वांशी संपर्क कमी केला होता, असेही गश्मीरने स्पष्ट केले असून त्यांनी ब्लॉक केल्याने आम्ही इतरांकडून त्यांच्याबद्दल माहिती काढत होतो. वडील हे आमचा म्हणजे आईचा, माझा, तसेच माझ्या पत्नीचा फोन देखील उचलत नव्हते, इतकेच नव्हे , आमचे नाते एकतर्फी होते. परंतु त्यांना आम्हाला भेटायची इच्छा असायची, तेव्हा ते यायचे. तसेच त्यांना एकटे राहण्याची इच्छा होत असे, तेव्हा ते निघून जायचे, असेही गश्मीर म्हणाला.
म्हणून आम्ही काहीही करू शकलो नाही…
माझे वडील रविंद्र महाजनी वेगळे का राहायचे याविषयी गश्मीर म्हणाला की, माझ्या वडिलांना एका छोट्या घरात सोडले आणि मी लक्झरी आयुष्य जगत आहे, असे आजही अनेकांना वाटत असेल, पण तसे कारण नव्हते. तर २० वर्षापूर्वी त्यांनी स्वतःच वेगळे राहण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा एक कुटुंब म्हणून आम्ही काहीही करू शकलो नाही. तसेच माझे वडील कदाचित सर्वात आदर्श व्यक्ती नसले तरी त्यांनी केलेल्या चांगल्या गोष्टींवर मी लक्ष द्यायचो, तरीही अनेक कारणांमुळे आमच्यातील संबंध ताणले गेले, पण ते माझे वडील आणि माझ्या आईचे पती होते. यामध्ये खोलवर अनेक वैयक्तिक गोष्टी, अनेक पैलू गुंतलेले आहेत, परंतु कुटुंबातील काही डार्क सिक्रेट सार्वजनिकरित्या उघड केले जाऊ नयेत, असे त्याने सांगितले.
त्यांचा स्वभाव आणि जीवनशैली
गश्मीर पुढे म्हणाला की, महत्त्वाचे म्हणजे माझा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा ते बराच काळ आमच्यासोबत राहिले होते. मात्र त्यांना एकटे राहायला आवडायचे. त्याचप्रमाणे त्यांना त्यांची कामे इतरांनी केलेली त्यांना आवडत नसे. त्यांच्याजवळ आम्ही केअरटेकर पाठवायचो, पण एक-दोन दिवसांत त्यांना कामावरून काढून टाकायचे. गेल्या तीन वर्षापासून त्यांनी आम्ही, आमचे जवळचे कुटुंब व त्यांच्या जवळच्या मित्रांसह लोकांशी मर्यादित संपर्क ठेवण्यास सुरुवात केली होती, शेजाऱ्यांशी बोलणे किंवा मित्रांसोबत मॉर्निंग वॉक करणे सुद्धा त्यांनी बंद केले आम्हाला त्यांच्या मृत्यूची माहिती उशिरा कळण्याचे हे देखील एक मोठे कारण होते, असेही त्याने स्पष्ट केले.
Actor Gashmir on Father Ravindra Mahajani Death Case