अॅड धर्मेंद्र चव्हाण, नाशिक
येथील मीराताई बोराटे यांची त्रंबकेश्वर जवळील दुगाव येथे शेतजमीन होती. त्याबाबत बोराटे व कुटुंबीय यांची कोर्टात केस प्रलंबित असताना व कनिष्ठ न्यायालयाचा निकाल त्यांच्या बाजूने लागला असताना दिलीप कुमार व त्यांच्या भावांनी तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या सहकार्याने सदरची जमीन कोर्टाचा स्थगिती आदेश असतानाही त्यांच्या नावावर करून घेतली होती. हे प्रकरण दिवाणी होते. पण मीराताई व त्यांच्या कुटुंबियांची फसवणूक करून तलाठी आणि सर्कल यांना हाताशी धरून दिलीप कुमार आणि त्यांचे भाऊ यांनी ही जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली होती.
या प्रकरणात मीराताई बोराटे यांच्या बाजूने मी नाशिक न्यायालयात भा द वि कलम 420 468 471,34 आदी कलमा प्रमाणे फौजदारी खटला दाखल केला, या खटल्यात दिलीप कुमार यांना जुहू येथील त्यांचे घरी जाऊन समन्स बजावण्यात आला होता. तरीही ते नाशिक न्यायालयात हजर झाले नव्हते. त्यानंतर न्यायालयाने अभिनेते दिलीप कुमार याना वॉरंट काढले होते. शेवटी न्यायालयाने वारंट काढल्या नंतर दिलीप कुमार नाशिकला न्यायालयात हजर झाले होते.
त्यांच्या जामीन अर्जास मी विरोध केला होता. दिलीप कुमार नाशिकला न्यायालयात आले तेव्हा त्यांच्या चाहत्यांची गर्दी जमली होती. दिलीप कुमार यांची फौजदारी खटल्यात न्यायालयात हजर राहण्याची ही पहिलीच वेळ होती. न्यायालयाने त्यांना जामीन देऊन मुक्तता केली होती. दिलीप कुमार न्यायालयात पहिल्यांदाच हजर झाले होते तेही त्यांना वारंट काढल्यानंतर. त्यांनी अत्यंत नम्रपणे निवेदन केले. न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली.
यावेळी न्यायालयाच्या आवारात प्रचंड गर्दी जमली होती. पोलीस बंदोबस्तही होता. दिलीप कुमार आणि त्यांच्या वकिलांशी या खटल्याच्या बद्दल तडजोड करण्याबाबत आमची चर्चा झाली होती. त्यानंतर दिलीप कुमार यांना या खटल्यात पुढे न्याय मिळणे जवळजवळ अशक्य असल्याने त्यांनी आमची तडजोड मान्य केली. सदर जमीन प्रकरणामध्ये समझोता झाल्याने सर्व खटले मागे घेण्यात आले. दिलीपकुमार यांनी अखेर मीराबाई यांना रक्कम दिली होती. हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले होते.