सिद्धी दाभाडे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
प्रसिद्ध सुपरस्टार धर्मेंद्र यांचा मुलगा अभिनेता बॉबी देओलने त्याच्या करिअर मध्ये एकापेक्षा एक चित्रपट केले आहेत, पण एक वेळ अशी आली की त्याला अपयशाला सामोरे जावे लागले. त्यावेळी बॉबी देओल डिप्रेशनमध्ये गेला होता. बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता बॉबी देओल त्याच्या वेगळ्या अभिनयासाठी आणि चित्रपटांमधील पात्रांसाठी ओळखला जातो. त्याने आतापर्यंत अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. बॉबी देओलचा जन्म 27 जानेवारी 1969 रोजी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या घरी झाला. बॉबी देओलचे पूर्ण नाव विजय सिंह देओल आहे. बॉबी देओल बॉलीवूडच्या अशा स्टारकिड्सपैकी एक आहे जे येताच पडद्यावर फेमस झाले.
बॉबी देओलने सुरुवातीचे शिक्षण जमुनाबाई नरसी स्कूल आणि ग्रॅज्युएशन मिठीबाई कॉलेज ऑफ कॉमर्स, मुंबई येथून पूर्ण केले आहे. त्याने बालकलाकार म्हणून अभिनयाच्या जगात प्रवेश केला. वडील धर्मेंद्र यांच्या ‘धर्म-वीर’ या चित्रपटात तो पहिल्यांदा दिसला होता. हा चित्रपट 1977 मध्ये आला होता. या चित्रपटात बॉबी देओलने धर्मेंद्रची बालपणीची भूमिका साकारली होती. बॉबी देओलने 1995 मध्ये मुख्य अभिनेता म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. 1995 मध्ये राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘बरसात’ चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्यांच्यासोबत राजेश खन्ना यांची मुलगी अभिनेत्री ट्विंकल खन्ना मुख्य भूमिकेत होती. ‘बरसात’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावर हिट ठरला. यानंतर बॉबी देओलने गुप्त, ‘सैनिक’, ‘बादल’, ‘बिच्छू’, ‘अजनबी’, ‘हमराज’ आणि ‘अपने’ असे अनेक हिट चित्रपट दिले, पण एक वेळ अशी आली की बॉबी देओलला अपयशाला सामोरे जावे लागले.
सततच्या फ्लॉप चित्रपटांमुळे बॉबी देओल डिप्रेशनमध्ये गेला, परिणामी बॉबी देओलला काम मिळणे बंद झाले. सोबतच तो दारू पिऊ लागला, मात्र त्याची पत्नी तान्या आहुजा हिने त्याला या व्यसनातून बाहेर काढले. इतकेच नाही तर बॉबी देओलने काही वर्षांपासून चित्रपटांपासून दूर राहून डीजे बनला होता. एका मोठ्या नाईट क्लबमध्ये तो डीजे वाजवू लागला. 2013 मध्ये बॉबीला त्याच्या होम प्रॉडक्शन चित्रपट यमला पगला दीवाना 2 नंतर चार वर्षांचा दीर्घ ब्रेक घ्यावा लागला होता. 2017 मध्ये, त्याने श्रेयस तळपदे दिग्दर्शित पदार्पण ‘पोस्टर बॉईज’ द्वारे पुनरागमन केले. दरम्यान, देओल कुटुंबाच्या अगदी जवळचा असलेला सलमान खान, बॉबीची मदत करण्यास आला आणि रेस 3मध्ये त्याची एंट्री दाखवली , परंतु त्याचा हा चित्रपट देखील थिएटरमध्ये काही खास चालला नाही.
बॉबी देओलसाठी २०२० हे वर्ष खास ठरले. बॉबीने 2020 मध्ये OTT प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले. नेटफ्लिक्सवर त्याचा क्लास ऑफ 83 हा चित्रपट प्रदर्शित झाला असताना, त्याने एमएक्स प्लेयरवरील प्रकाश झा दिग्दर्शित वेब सीरिज आश्रममध्ये मुख्य भूमिका साकारली होती. बॉबी देओलचा चित्रपट आणि वेब सीरिज दोन्ही हिट ठरले. आश्रम या वेबसिरीजमध्ये त्यांनी काशीपूरच्या बाबा निरालाची भूमिका साकारली होती, जी चांगलीच पसंतीस ठरली होती.