मुंबई – पौराणिक कथेवरील टीव्ही मालिका ‘रामायण’ मध्ये रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी (वय ८३) यांचे मंगळवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अरविंद यांनी हिंदी आणि गुजराती भाषेतील सुमारे ३०० चित्रपटांमध्ये काम केले होते.
रामायण ही १९८६ ते १९८८ दरम्यान दूरदर्शन या दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित झालेली मालिका अत्यंत प्रसिध्द झाली होती. रामायण या पौराणिक कथेवर आधारित असलेल्या या मालिकेचे निर्माते व दिग्दर्शक रामानंद सागर होते. अरविंद त्रिवेदी यांचे रावणाचे पात्र इतके लोकप्रिय होते की, त्यानंतर ‘राम लीला’ मध्ये हे पात्र साकारणारा प्रत्येक पात्र त्यांच्या भूमिकेतून प्रेरणा घेत असे. अरविंद त्रिवेदी बराच काळ आजारी होते. मंगळवारी रात्री उशिरा त्यांना हृदयविकाराचा झटका आला, अशी माहिती अरविंद यांचे पुतणे कौस्तुभ त्रिवेदी यांनी दिली.
अरविंद त्रिवेदी यांचा जन्म मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात झाला. गुजराती रंगभूमीपासून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांचा भाऊ उपेंद्र त्रिवेदी त्यांनी देखील गुजराती चित्रपटांमध्ये काम केले आहे. अरविंद त्रिवेदी रामायणातील रावणाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध होते. अरविंद यांनी रावणाचे इतके शक्तिशाली पात्र साकारले की, प्रेक्षकांना अजूनही तो मोठा आवाज आणि त्यांची चालण्याची शैली आवडते. रामायण टीव्हीवर यायचे, प्रेक्षक त्यांच्या आवडत्या रावणाला पाहण्यासाठी उत्सुक असत. रामायणातील रावणाच्या भूमिकेच्या माध्यमातून अरविंद त्रिवेदी हे घराघरात पोहोचले होते.
रामायण’मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या अरविंद त्रिवेदी यांच्या आणखी अनेक पात्रांचेही कौतुक झाले होते. त्यांनी ‘विक्रम और वेताल’ या टीव्ही मालिकेतही काम केले होते. या मालिकेनेही छोट्या पडद्यावर बराच काळ वर्चस्व गाजवले होते. त्यानंतर अरविंद त्रिवेदी यांनी गुजराती भाषेत धार्मिक आणि सामाजिक चित्रपटांद्वारे गुजराती प्रेक्षकांमध्ये ओळख मिळवली, तिथे त्यांनी जवळपास ४० वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले होते.
अरविंद हे बराच काळ आजारांशी लढत होते. त्यांना काही काळ चालणे अशक्य झाले होते. रामायणात लक्ष्मणची भूमिका साकारणारे अभिनेता सुनील लाहिरी यांनी अरविंद यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. सुनीलने ट्विटरवर लिहिले, ‘मी माझे माझे मार्गदर्शक आणि एक अद्भुत व्यक्ती गमावली आहे. सुनील लाहिरी व्यतिरिक्त, अनेक कलाकार आणि चाहत्यांनी अरविंदला सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.
https://twitter.com/narendramodi/status/1445603672461758465