इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सिमला येथे जन्मलेल्या अनुपम खेर यांनी ५०० हून अधिक चित्रपटात काम केलेले आहे. अनुपम खेर हे मुंबईत आले तेव्हा त्यांच्याकडे फक्त ४० रुपये होते. त्यावर त्यांनी चित्रपटसृष्टीत संघर्ष करत आज मोठे नाव मिळवले आहे. अनुपम खेर हे नाव खरंतर चित्रपटसृष्टीतलं एक वजनदार नाव आहे. तरीही आज अनुपम फारसे चित्रपटात काम करताना दिसत नाहीत. अनुपम खेर हे सध्या राजकीय गोष्टींमध्येच जास्त रममाण असतात असाही आरोप कित्येक चाहते त्यांच्यावर करत आहेत. आता मात्र लवकरच ते कंगना राणावत दिग्दर्शित चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा आहे. असे असले तरी, खेर यांनी मात्र एका मुलाखतीत आपल्या मनातील एक खंत बोलून दाखवली आहे. चित्रपटसृष्टीकडून म्हणावं तसं काम मिळत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
अनुपम खेर गेली काही वर्षं त्यांची राजकीय मतं अगदी परखडपणे मांडत आहेत. त्यावरून त्यांना प्रचंड ट्रोलही करण्यात येतं. पण ते त्यांच्या विचारधारेशी अगदी प्रामाणिक असल्याचं बऱ्याच घटनांमधून समोर आलंय. नुकतंच त्यांनी एका मुलाखतीत आता चित्रपटसृष्टीकडून म्हणावं तसं काम मिळत नाही अशी खंत व्यक्त केली आहे. आधी आदित्य चोप्रापासून करण जोहरच्या कित्येक चित्रपटात अनुपम खेर यांची महत्त्वाची भूमिका असायची. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, ‘कुछ कुछ होता है’ अशा कित्येक मुख्य प्रवाहातल्या चित्रपटात अनुपम खेर यांची महत्त्वाची भूमिका होती. पण सध्या या मोठ्या बॅनरखाली बनणाऱ्या चित्रपटात ते आपल्याला दिसत नाही. याविषयी बोलताना अनुपम म्हणाले की “एकेकाळी मी त्यांचा अत्यंत लाडका होतो. पण आता गोष्टी बदलल्या आहेत.”
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनुपम म्हणाले, “मी आता मुख्यप्रवाहाच्या चित्रपटांचा भाग नाही. मी सध्या करण जोहर किंवा साजिद नाडियादवाला सारख्या मोठ्या लोकांबरोबर काम करत नाही, कारण मला तिथून कामासाठी ऑफरच आलेली नाही. एकेकाळी आम्ही खूप घनिष्ट मित्र होतो. मी त्यांच्या कित्येक चित्रपटात काम केले आहे. आता ते मला चित्रपटात घेत नाही याचा दोष मी सर्वस्वी त्यांना देणार नाही. त्यांनी मला काम दिलं नसलं तरी मी माझा मार्ग शोधला आहे, मी दाक्षिणात्य चित्रपटात काम करत आहे. जेव्हा एखादा दरवाजा बंद होतो तेव्हा दुसरा दरवाजा आपोआप उघडतो.”
येणाऱ्या वर्षात अनुपम खेर हे कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट भारताच्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शनही खुद्द कंगनाच करणार आहे. याबरोबरच सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुरज बडजात्या हे खूप वर्षांनी दिग्दर्शनात उतरणार आहेत. त्यांच्या आगामी ‘उंचाई’ या चित्रपटात अनुपम खेर महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. या चित्रपटात अनुपम यांच्याबरोबर अमिताभ बच्चन, डॅनी डेंझोप्पा, सारिका असे कलाकारही पाहायला मिळणार आहेत. अनुपम खेर नुकतेच विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द कश्मीर फाईल्स’मध्ये दिसले होते. त्यांच्या अभिनयाची चांगलीच प्रशंसा झाली. अनुपम खेर हे हिमाचल प्रदेशातील राहणारे असून त्यांचे घराणे हे काश्मिरी पंडित आहे.
Actor Anupam Kher Clarify That not Offer Movies
Entertainment Role