नाशिक : अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणा-या सात जणासह त्यांना सहाय्य करणा-या अन्य गुह्यातील आठ अशा पंधरा जणांविरूध्द शहर पोलीसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली. बलात्काराच्या गुह्यामुळे या कोळे गँगचा पर्दाफाश झाला असून, या गँगमधील काही सदस्यांवर जबरी चोरी,लुटमार सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गँगमध्ये एक महिलेसह अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.
एकलहरा रोड भागातील अल्पवयीन मुलीवर ७ व ९ जानेवारी रोजी सामूहिक बलात्कार झाला होता. या गँगमधील महिलेने मुलीस आपल्या घरी घेवून जात हे कृत्य घडवून आणले होते. या ठिकाणी गँगचा म्होरक्या सुनिल कोळे, दीपक खरात, सोमनाथ खरात, आकाश गायकवाड, रवी उर्फ फँड्री, विधी संघर्षिक बालक आदींनी बालिकेस पोटात चाकू खुपसण्याचा धमकी देत बळजबरीने सामूहिक बलात्कार केला होता.
याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता संशयित सुनिल कोळे हा सराईत गुन्हेगार असून त्याची टोळी असल्याची माहिती समोर आली. या टोळीने कल्याण, संगमनेर, उपनगर, नाशिकरोड याठिकाणी जबरी चोरी, लूटमार, सारख गुन्हे केल्याचे समजले. यानंतर पोलिसांनी शहरातून संघटीत गुन्हेगारी मोडीत काढण्याच्या दृष्टीने सुनील कोळे यांच्यासह त्याच्या टोळीतील साथीदार आकाश आठवले, अमोल शेजूळ, रहेमान शेख, सायमन मॅनवेल, समीर खान, ताजमुल सैय्यद, भूषण दोडमल, किशोर गिरी यांच्याविरूद्ध नियोजित बद्ध कट रचून गुन्हे केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरूद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली.
चार महिन्यापूर्वी नाशिक पोलिसांनी शहरातील संघटीत गुन्हेगारी मोडून काढण्याच्या दृष्टीने खूनाच्या गुह्यातील २२ जणांच्या टोळीविरूद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. तर सहा जणांना एमपीडीए अंतर्गत स्थानबध्द करण्यात आले आहे.