मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अवैध विदेशी मद्य विक्री व वाहतुकीवर उत्पादन शुल्क विभाग नियमित कारवाई करीत असतो. उत्पादन शुल्क विभागाने अवैध विदेशी मद्य वाहतुकीवर कारवाई करत २.२२ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ठाणे जिल्ह्यातील तळोजा रूफिंग उद्योगसमोर, सदुद्दीन इस्टेट, मुंब्रा – पनवेल रस्ता, मंजरली येथे गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये मागील बाजूस मोठ्या प्रमाणात अवैध विदेशी मद्याचा साठा आढळून आला. या ट्रकमध्ये विविध ब्रँडच्या विदेशी मद्याचे एकूण १,५६० बॉक्स आढळले.
याप्रकरणी वाहनांमधील दोघांना महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली. या कारवाईमध्ये १२ चाकी चॉकलेटी रंगाचा ट्रक क्रमांक आर जे ५२ जीए ३७६२ सह परराज्यातील विदेशी मद्याचे १,५६० बॉक्स, तीन मोबाईल असा अंदाजित २ कोटी २२ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींमध्ये वाहन चालक साहिद मेहमूदा खान (वय ४९) रा. छायसा ता. हाथिन जि. पलवल (हरियाणा) आणि पंकज जगदीश साकेत (वय २५) रा. कलवारी ता. तेऊथर जि. रीवा (मध्यप्रदेश) यांचा समावेश आहे.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ.राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, कोकण विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. निरीक्षक दिगंबर शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक एच. बी यादव, रिंकेश दांगट, व्ही. व्ही. सकपाळ, सहायक दुय्यम निरीक्षक महावीर कोळेकर, जवान हर्षल खरबस, श्रीराम राठोड, हनुमंत गाढवे, अमित सानप, कुणाल तडवी, सागर चौधरी यांच्या पथकाने कारवाई पूर्ण केली. पुढील तपास निरीक्षक दिगंबर शेवाळे करीत आहे.