नाशिक – दूध आंदोलनातील सातही आंदोलकांची निर्दोष मुक्तता केल्याची माहिती कल्याण सत्र न्यायालयात इंजि. हंसराज वडघुले यांनी दिली. ते म्हणाले की, १६ जुलै २०१८ रोजी दूध दरवाढीसाठी राज्यभर आंदोलनाचा एल्गार झाला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तत्कालीन युवाप्रदेशाध्यक्ष इंजि. हंसराज वडघुले, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक पगार यांचे नेतृत्वात मुंबईला जाणारा दूध पुरवठा खंडित करण्यात आला होता. यामध्ये कसारा घाटात शेतकरी आंदोलक आणि दूध वाहक टँकरच्या बंदोबस्तासाठी असणारे पोलीस पथक यांच्यामध्ये एकच संघर्ष झाला होता.
तेव्हा हंसराज वडघुले, दीपक पगार, नितीन रोठे पाटील सोमनाथ बोराडे, नाना बच्छाव, संजय जाधव,युवराज देवरे या सात आंदोलकांवर कसारा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये टँकरची हवा सोडणे, तोडफोड करणे, संरक्षण देणाऱ्या पोलीस पथकाला धक्काबुक्की करणे इत्यादी गंभीर स्वरूपाची गुन्हे नोंद करण्यात आले होते, तसेच सुमारे महिनाभर आंदोलकांना तळोजा सेंट्रल जेल(मुंबई) येथे तुरुंगवासात टाकण्यात आले होते. तेव्हापासून कल्याण सत्र न्यायालयात हा खटला सुरू होता. आंदोलनात सर्व महत्वपूर्ण पदाधिकारी असल्याने आंदोलन चिघळू नये म्हणून सरकारच्या सूचनेनुसार या आंदोलकांना ताब्यात घेऊन खोटे गुन्हे दाखल केले होते, आंदोलन दडपण्यासाठी तत्कालीन सरकारच्याच पोलीस प्रशासनाला तशा सूचना होत्या, असा युक्तिवाद आंदोलकांच्या वकीलांनी न्यायालयात केला.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश, कल्याण कोर्ट यांनी हा युक्तिवाद मान्य करून सातही आंदोलकांची निर्दोष मुक्तता केली. आंदोलकांच्या वतीने सुप्रसिद्ध वकील अॅड. जगदीश वरघडे, अॅड. प्रसन्ना बारसिंग मॅडम यांनी प्रभावी युक्तिवाद केला. सुमारे साडेचार वर्ष कल्याण येथील जिल्हा सत्र न्यायालयात हा खटला सुरू होता, माननीय न्यायमूर्ती पीआर आस्तुरकर साहेब यांनी १२ ऑगस्ट २०२२ रोजी आंदोलकांची निर्दोष मुक्तता केली. या दरम्यान आंदोलकांना प्रचंड यातना सहन करावा लागल्या.
तुरुंगवासाच्या काळात शहापूर येथील विनायक पवार, बबन हरणे, चंद्रकांत भोईर इत्यादी चळवळीतील शिलेदारांनी आंदोलकांना संपूर्ण सहकार्य केले. निकाल जाहीर होताच जिल्ह्यातील शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. यामध्ये साहेबराव काका मोरे, सुधाकर मोगल, भाऊसाहेब तासकर, रतन मटाले, अण्णा निकम,संजय पाटोळे, निवृत्ती घारे, संदीप जगताप, सचिन कड, संपत जाधव, सागर बोराडे, वैभव देशमुख, सचिन पवार, निलेश कुसमोडे, मनोज भारती, निलेश काका चव्हाण, परशराम शिंदे, विक्रम गायधनी, लकी बावस्कर, रवींद्र पगार सिन्नर, आत्माराम पगार, श्रावण देवरे, डोंगर अण्णा पगार, गोविंद पगार, राजू शिरसाठ, योगेश कापसे, प्रभाकर वायचळे, समाधान भारतीय इत्यादी शेकडो कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.
बचेंगे तो और भी लढेंगे
आंदोलनाच्या दणक्याने अधिवेशन काळात विरोधी पक्षाने सरकारवर हल्लाबोल केला होता .तत्कालीन सरकारला प्रतिलिटर मागे ५ रुपये भाव वाढवून द्यावे लागले होते. त्यामुळे आमच्यासारख्या मोजक्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला तरी लाखो शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याची भावना होती. शेतकरी हिताची ही लढाई शेवटच्या श्वासापर्यंत अव्याहतपणे सुरूच राहील. सत्यमेव जयते. बचेंगे तो और भी लढेंगे
इंजि. हंसराज वडघुले पाटील