विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अरबी समुद्रात आलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झाले, यात एक जहाजही बुडाले. यावेळी त्यावरील कॅप्टनने साथ सोडली, तरी नौदलाच्या जवानांनी मात्र मोठ्या शौर्याने सामना करीत बुडणाऱ्या अनेक लोकांचे प्राण वाचविले.
पी ३०५ एक बार्ज ही एक सपाट बाटलीबंद बोट असून ती नदी आणि कालव्याच्या वाहतुकीत विशेषत: अवजड माल वाहतुकीसाठी डिझाइन केलेली आहे. तसेच वादळाच्या पार्श्वभूमीवर इशारा देण्यात आला असताना बार्जमधील लोकांना वेळेत पुन्हा सुरक्षित ठिकाणी बोलावण्यात आले नाही. दरम्यान, नौदलाला याबाबत कळविण्यात आले. त्यानंतर सैनिकांनी अत्यंत खराब हवामानाचा सामना करताना पी ३०५ बार्जवरील २७३ पैकी १८८ लोकांची सुटका केली आहे. त्याचबरोबर ४९ मृतदेहही ताब्यात घेण्यात आले, असल्याचे नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले.
आयएनएस कोची आणि आयएनएस कोलकाता या बोटी आता लोकांसह मुंबई बंदरात परत येत आहेत. आयएनएस तेग, आयएनएस बेतवा, आयएनएस बियास, पी ८१ विमान आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी शोध आणि बचावकार्य सुरू आहे. या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी भारतीय नौदलाने चांगली कामगिरी केली. या उलट जहाजाचा कॅप्टन याने हे काम करायला हवे होते, त्याने कठीण काळात पळ काढल्याचा आरोप केला गेला.
जहाजातील कॅप्टन आणि कंपनी या दोघांनी त्या वादळाकडे दुर्लक्ष केले ज्यामुळे २६३ लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. त्यानंतर भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाच्या जवानांनी लोकांना वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला. जेव्हा समुद्राच्या लाटा लोकांना गिळंकृत करण्यासाठी हतबल होत असतांना, अनेक लोक मोठ्या लाटावर फेकले जात होते, तेव्हा अनेक लोकांना नवीन जीवन देण्यासाठी नेव्हीचे जवान जणू देवदूत बनून आले होते.