दुचाकींच्या अपघातात एक ठार
नाशिक – दोन दुचाकींच्या झालेल्या अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी (दि.१) गडकरी सिग्नल येथे घडली. पंढरीनाथ दामोदर खरे (७५, रा. वावी ठुशी, ता. निफाड) असे या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर त्यांचा मुलगा विजय खरे (४५) हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरूवारी रात्री साडेनऊच्या सुमारास खरे पितापुत्र त्यांच्या दुचाकीवरून सारडा सर्कलकडून गडकरी चौकाकडे जात असताना गडकरी सिग्नल येथे सीबीएसच्या बाजुने भरधाव आलेली दुचाकी एमएच १५ सीआर ३१७५ या दुचाकीने त्यांच्या दुचाकीस जोराची धडक दिली. यामध्ये दोघे गाडीवरून खाली पडून गंभीर जखमी झाले. यात पंढरीनाथ खरे यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले परंतु त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात सादाशिक बाबुराव पोरजे (रा. वडनेर दुमला, पाथर्डीरोड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
…..
ऑनलाईन रोलेट खेळवणारे जेरबंद
नाशिक – मोबाईलवरील फनगेम नावाच्या अॅपद्वारे रोलेट जुगारासाठी पॉइंट व आयडी पुरवणारे व इतरांना जुगार खेळवणार्या दोघांना भद्रकाली पोलीसांनी जेरेबंद केले. त्याच्याकडून ५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सिद्धांत गुलाबराव शिराळ व मनोज बैरागी (२४, रा. पंचशीलनगर, भद्रकाली) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पंचशीलनगर मधील खंडेराव मंदिराशेजारी रस्त्याच्या कडेला रोलेट जुगारासाठी पॉइंट तसेच आयडी देणारे संशयित बसले असल्याची माहिती पोलीसांना मिळताच त्या ठिकाणी छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोबाईल व ५ हजार २५० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार वाय.एस. पाटील करत आहेत.
…..