ट्रॅक्टर ट्रॉलीखाली चिरडून ऊसतोड महिलेचा मृत्यु
नाशिक : ऊसाने भरलेला ट्रॅक्टर अचानक मागे आल्याने पाठीमागे काम करणा-या ४५ वर्षीय उसतोड मजूर महिलेचा चिरडून मृत्यु झाला. हा अपघात शिलापूर शिवारात झाला यामध्ये ट्रॉलीचे चाक महिलेच्या अंगावरून गेल्याने तिचा चेंदामेंदा झाला होता. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मनिषा जगन राठोड (रा.नांदूरनाका,पोलीस चौकीसमोर) असे मृत महिलेचे नाव आहे. शिलापूर ता.जि.नाशिक येथील उत्तम पेखळे यांच्या शेतात ऊसतोड सुरू असून गुरूवारी (दि.२७) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. मृत महिला अन्य मजूरांसमवेत ट्रॅक्टरमध्ये ऊसाची मोळी टाकत होती. याचवेळी अचानक भरलेला ट्रॅक्टर पाठीमागे आल्याने महिला ट्रॉलीच्या चाकात अडकली. या घटनेत भरलेली ट्रॉलीचे चाक तिच्या अंगावरून गेल्याने ती जखमी झाली होती. ठेकेदारासह अन्य मजूरांनी तिला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तिला मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत.
…..