इनोव्हाच्या धडकेत सायकलस्वार जखमी
नाशिक : भरधाव इनोव्हा कारने दिलेल्या धडकेत दोन सायकलस्वार जखमी झाले. हा अपघात गंगापूर रोडवरील बॉबीज हॉटेल भागात झाला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजिंक्य त्र्यंबक खैरनार (२३) व शिरीष नामदेव धुमाळ (३४) अशाी जखमी सायकलस्वारांची नावे आहेत. याप्रकरणी सौरव सचितानंद गुंजाळ (रा.आकाशवाणी टावर,) यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार व जखमी मित्र मंगळवारी (दि.२५) सायंकाळच्या सुमारास सायकलवरून फेरफटका मारीत असतांना हा अपघात झाला. तिघे मित्र आपआपल्या सायकलवर गंगापूररोडने प्रवास करीत असतांना बॉबीज हॉटेल समोर पाठीमागून भरधाव आलेल्या इनोव्हा कारने (एमएच १५ सीए २२५) दोन सायकलींना धडक दिली. या अपघातात खैरनार व धुमाळ हे मित्र जखमी झाले असून याप्रकरणी कारचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक झिरवाळ करीत आहेत.
…
दोन दुचाकींच्या धडकेत वृध्दा ठार
नाशिक : दोन दुचाकींच्या धडकेत ६० वर्षीय वृध्दा ठार झाली. या अपघातात महिलेचा मुलगाही जखमी झाला असून हा अपघात इतका भयंकर होता की, ट्रिपलसीट दुचाकीचे चाक निखळून पडल्याने दुचाकी दुभाजकावर आदळली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अंजनाबाई नाथा खिल्लारे (६०) असे मृत वृध्देचे नाव असून या अपघातात दादाराव नाथा खिल्लारे (४० रा.भोगाव ता.जिंतूर, परभणी) असे जखमी मुलाचे नाव आहे. खिल्लारे मायलेक धम्मपाल नाथा खिल्लारे (३४ रा.म्हाडा कॉलनी,कलानगर) यांच्या मोपेड (एमएच १५ एफडी ०३६४) दुचाकीवर प्रवास करीत होते. सोमवारी (दि.२४) सायंकाळच्या सुमारास खिल्लारे मायलेक ट्रिपलसिट संतोष टी पॉईट कडून औरंगाबाद नाक्याकडे प्रवास करीत असतांना पल्लवी हॉटेल शेजारील पेट्रोल पंपाच्या सर्व्हिस रोडवर भरधाव दुचाकीवरील चालक धम्मपाल खिल्लारे यांचा ताबा सुटला. यावेळी समोरून येणा-या अॅक्टीव्हा आणि मोपेड दुचाकीत अपघात झाला. या अपघातात ट्रिपलसिट मोपेडचे चाक निखळून पडल्याने मोपेड दुभाजकावर आदळली. यात वृध्देचा मृत्यु झाला. तर दादाराव खिल्लारे जखमी झाले असून याप्रकरणी चालक धम्मपाल खिल्लारे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक कासर्ले करीत आहेत.
…