गतिरोधक ठरताय जीवघेणे; विवाहितेचा मृत्यू
नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील लेखानगर येथील गतिरोधकामुळे विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता दुसर्या गतिरोधकावर एका विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.१५) सकाळी 7.20 वाजता नांदूरगावातील शाळेसमोरच्या गतिरोधकावर घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात करण्यात आली आहे. आशाबाई मोतीलाल बिरारी (वय ४७, रा.खडकपाडा) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आशाबाई बिरारी पतीसमवेत दुचाकीवरुन जत्रा हॉटेल येथून नांदूरगावाकडे जात होत्या. नांदूरगावातील शाळेसमोरच्या गतीरोधकावर दुचाकी आदळली. त्यात आशाबाई बिरारी यांचा दुचाकीवर तोल गेल्याने त्या खाली पडल्या. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस हवालदार कहांडळ करत आहेत.
भरधाव कारची कारला धडक
भरधाव कारने विरुद्ध दिशेने येणार्या कारला धडक दिल्याची घटना रविवारी (दि.१५) सायंकाळी ६.३० वाजता मुंबई-आग्रा महामार्गावर औरंगाबाद नाका ते जत्रा हॉटेलदरम्यान घडली. याप्रकरणी राहुल धांडे यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी सायखेडा (ता. निफाड) येथील संशयित अमोल देवराम नागरेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, राहुल धांडे कार (एमएच ०५-ईडी ०५०५)ने मुंबई-आग्रा महामार्गावरुन जत्रा हॉटेलकडे जात होते. ते अमृतधाम सॅनिटरीअम भिंतीजवळ आले असता विरुद्ध दिशेने येणार्या कार (एमएच १५-एफएफ १९४१)ने धांडे यांच्या कारला धडक दिली. या अपघातात धांडे यांच्या कारचे नुकसान झाले. पुढील तपास पोलीस हवालदार थेटे करत आहेत.
स्कॉर्पिओच्या धडकेत दुचाकीचालक जखमी
भरधाव स्कॉर्पिओने दिलेल्या धडकेत दुचाकीचालक जखमी झाल्याची घटना वृंदावन सोसायटीसमोर, इंदिरानगर, नाशिक येथे घडली. याप्रकरणी सतिश अहिरे यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी स्कॉर्पिओचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सतिश अहिरे यांचे मित्र रितेश यांच्या दुचाकीला स्कॉर्पिओ(एमएच ०४-डीआर ४७११)ने धडक दिली. या अपघातात रितेश गंभीर जखमी झाले. पुढील तपास पोलीस हवालदार ठाकरे करत आहेत.