रस्ता ओलांडत असतांना भरधाव दुचाकीची धडक; एक जण जागीच ठार
नाशिक : रस्ता ओलांडत असतांना भरधाव दुचाकीने धडक दिल्याने परप्रांतीय पादचारी ठार झाला. हा अपघात औद्योगीक वसाहतीत झाला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. रामचंद्र ननकू जांभेकर (४२ मुळ रा.मध्यप्रदेश हल्ली,नाशिकरोड) असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. जांभेकर गुरूवारी (दि.५) सकाळच्या सुमारास औद्योगीक वसाहतीतील सिकॉप कारखान्याकडून महिंद्रा कंपनीच्या दिशेने पायी जात असतांना ही घटना घडली. महिंद्रा कंपनीसमोर रस्ता ओलांडत असतांना भरधाव आलेल्या अज्ञात निळया रंगाच्या अॅक्टीव्हाने त्यास धडक दिली. चालकाचा आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. या घटनेत जांभेकर गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यु झाला. तर अॅक्टीव्हास्वार आपल्या वाहनासह पसार झाला असून विजय घोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस दप्तरी अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक काळे करीत आहेत.
………..
पेरूची बाग तोडून शेतावर बळजबरीने कब्जा
नाशिक : पेरूची बाग तोडून टाकत दोघांनी उभे पिक नांगरून शेतावर बळजबरीने कब्जा केल्याचा प्रकार चिडे मळा भागात घडला. या शेतात मालकी हक्काचा बोर्ड लावल्याने हा प्रकार समोर आला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण रामनाथ अरिंगळे व गणेश रामनाथ अरिंगळे (रा.अरिंगळे मळा,ना.रोड) असे शेतावर कब्जा करणा-या संशयीतांची नावे आहे. याप्रकरणी सुरेश वामनराव गायकवाड (रा.गायकवाड मळा,दत्तमंदिररोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गायकवाड यांची गोरेवाडीच्या पुढे असलेल्या चिडे मळयात शेतजमिन आहे. या शेतात पेरूची बाग असून त्यात सोयाबीनची पेरणी करण्यात आलेली होती. बुधवारी (दि.४) रात्री संशयीतांनी ट्रॅक्टरच्या माध्यमातून अतिक्रमण केले. कंपाऊड तोडून संशयीतांनी ट्रॅक्टरच्या माध्यमातून नांगरटी केली. यामुळे पेरूच्या बागेसह सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. तसेच नांगरलेल्या शेतजमिनीत किरण व गणेश अरिंगळे यांच्या मालकिची शेतजमिन असलेला फलक लावल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास हवालदार चिखले करीत आहेत.
…..