नाशिक : अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दोन जणांना मृत्यू झाला आहे. हे दोन्ही अपघात वेगवेगळ्या ठिकाणी झाले आहे. त्यात एका ७१ वर्षीय वृध्देसह ४२ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. याप्रकरणी म्हसरूळ आणि सातपूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पहिला अपघात त्र्यंबकरोडवरील पपया नर्सरी भागात झाला. सुभाष बाजीराव शार्दुल (रा.प्रबुध्द नगर) हे रविवारी दुपारच्या सुमारास त्र्यंबकरोडने पायी जात असतांना पपया नर्सरी परिसरातील शिव हॉस्पिटल समोर त्यांना भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात शार्दुल गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात भाऊ विलास शार्दुल यांनी दिलेल्या तक्रारीवरून अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.
दुस-या अपघातात मिनाबाई प्रकाश मिस्तरी (७१ रा. राम रेसि.एरिगेशन कॉलनी,मखमलाबाद) या रविवारी सायंकाळच्या सुमारास म्हसरूळ मखमलाबाद लिंकरोडवरील चाणक्यपुरी सोसायटी भागात गेल्या होत्या. या सोसायटी समोरील रस्ता ओलांडत असतांना भरधाव जाणा-या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली होती. या घटनेत त्यांच्या डोक्यास वर्मी मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलगा राहूल मिस्तरी (वाघ) याने दिलेल्या तक्रारीवरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक चतुर करीत आहेत.