नाशिकरोड – ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना नाशिक-पुणे महामार्गावरील उपनगर सिग्नलवर सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडली. या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव प्रथमेश चिंधा अहिरे (४०, आम्रपाली नगर, कॅनलरोड, जेलरोड) असे आहे. प्रथमेश यांच्या पत्नीचे दोनच दिवसापूर्वी निधन झाले होते. तिचा फोटो तयार करण्यासाठी ते नाशिकरोड येथे आले होते. तिथून पुढील कार्यक्रम सांगण्यासाठी ते सिद्धार्थ नगर येथे राहणाऱ्या आपल्या बहिणीकडे जात असतांना हा दुर्दैवी अपघात झाला. त्यात प्रथमेशचा मृत्यू झाला .पोलिसांनी याप्रकरणी ट्रकचालकास अटक केली आहे.
या अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बघून प्रथमेशचे मोठे बंधू आणि वहिनी यांना चांगलाच धक्का बसला. प्रथमेशला तेरा आणि सात वर्षांची दोन मुले आहेत. या अपघातामुळे नाशिक-पुणे मार्गावर वाहनांची मोठी रांग लागली होती. घटनास्थळी उपनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंकज भालेराव, पोलिस उपनिरीक्षक रमेश शिंदे, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक सुधीर दुमरे, सहायक पोलिस निरीक्षक धनराज पाटील, साहेबराव पवार तसेच पोलिस दाखल झाले. प्रथमेश यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. पुढील तपास उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.