नाशिक : शहरातील वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. त्यात एका २८ ते ३० वयोगटातील तरूणासह ८६ वर्षीय वृध्दाचा समावेश आहे. याप्रकरणी मुंबईनाका आणि पंचवटी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून एका चालकास अटक करण्यात आली आहे. मुंबई आग्रा महामार्गावरील वडाळाना भागात कारने दिलेल्या धडकेत अनोळखी तरूण ठार झाला. २८ ते ३० वयोगटातील पादचारी युवक शनिवारी सकाळच्या सुमारास उड्डाणपूलाखालून द्वारकेच्या दिशेने पायी जात असतांना हा अपघात झाला. व्होकार्ट हॉस्पिटल समोरील पोल क्र. पी.१२१ जवळ तो रस्ता ओलांडत असताना भरधाव एमएच १५ ईपी ६३४४ या कारने त्यास जोरदार धडक दिली होती. या अपघातात तो गंभीर जखमी झाल्याने नागरीकांनी त्यास रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना रविवारी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस नाईक सिध्दार्थ बिरारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून समिर लोहार (रा.तिडके कॉलनी) या कार चालकास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गेंगजे करीत आहेत. दुसरा अपघात हिरावाडीत झाला. या अपघातात बाजीराव बादशाह देशमुख (८६ रा.भावसंगम सोसा.रेशिमबंध लॉन्स मागे,हिरावाडी) हे वृध्द ठार झाले. देशमुख गेल्या शुक्रवारी (दि.८) आपल्या घराजवळून पायी जात असतांना भरधाव दुचाकीने एमएच १५ डीएक्स ८९७१ त्यांना धडक दिली होती. या घटनेत ते गंभीर जखमी झाले होते. कुटूंबियांनी त्यांना रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आशिष देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुचाकीस्वार विनोद बोरसे (रा.हिरावाडी) यांच्याविरूध्द पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खैरनार करीत आहेत.