नाशिक : पिंपळगाव बहुला येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने बालिका ठार
नाशिक : पिंपळगाव बहुला येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने रस्त्याच्या कडेला खेळणारी बालिका ठार झाल्याची घटना घडली आहे. माया दत्तू वाघ (वय ८, रा. पिंपळगाव बहुला, नाशिक) असे अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झालेल्या बालिकेचे नाव आहे. दरम्यान या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. माया ही काल दुपारच्या सुमारास पिंपळगाव बहुला येथे चंद्रभागा लॉन्सजवळ रस्त्याच्या कडेला खेळत होती. त्यावेळी भरधाव अज्ञात वाहनाने तिला ठोस मारली. तसेच या अपघातात तिच्या डोक्याला व तोंडाला जबर दुखापत झाल्याने बालिकेच्या चुलतीने औषधोपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.
आर्टिलरी रोड भागात घरफोडी
नाशिक : देवळाली गावातील आर्टिलरी रोड भागात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटातून सोन्याचांदीचे दागिणे आणि मनगटी घड्याळ असा सुमारे ७१ हजार ७०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. या घरफोडी प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अझहर अन्सार सय्यद (रा.केशव लक्ष्मी सोसा.आर्टिलरी सेंटर रोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. सय्यद कुटुंबिय गेल्या बुधवारी (दि.२०) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक चौधरी करीत आहेत.