नाशिक : पाथर्डी मार्गावर भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळल्याने २८ वर्षीय चालक ठार झाल्याची घटना घडली आहे. लखन चंपालाल पाटील (२८ रा.समृध्दी पार्क,पाथर्डी फाटा) असे अपघातात ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे. पाटील गुरूवारी दुपारच्या सुमारास पाथर्डी गावाकडून पाथर्डी फाट्याच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. पाथर्डी सर्कल भागातील एचपी पेट्रोल पंपा समोर भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळल्याने पाटील गंभीर जखमी झाला होता. सह्याद्री हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.