नाशिक : औद्योगीक वसाहतीतील श्रमिकनगर भागात भरधाव मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली आहे. मोहन राजकुमार साहू (३५ रा.दत्तमंदिर चौक,जाधव संकुल) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. साहू गुरूवारी सायंकाळच्या सुमारास सातपूर कडून शिवाजीनगरच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. अंबड लिंकरोडने ते प्रवास करीत असतांना श्रमिकनगर येथील सातमाऊली चौकात पाठीमागून येणा-या एमएच ४४, ८७६५ या मालट्रकने दुचाकीस जोरदार धडक दिली. या अपघातात साहू गंभीर जखमी झाले होते. स्थानिकांनी तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉ.राहूल पाटील यांनी त्यांना मृत घोषीत केले. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जमादार गांगुर्डे करीत आहेत.