नाशिकरोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – धावत्या कारने पेट घेतल्याने कार जळून खाक झाल्याची घटना नाशिक पुणे महामार्गावरील चेहेडी शिव येथे शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान घडली. कुमार विधाणी रा. होलाराम कॉलनी, शरणपूर रोड, नाशिक हे पत्नी आणि मुलासह हिरो होंडा सिटी कारने (एमएच २ बीजे ९९८७ ) सिन्नर कडून नाशिकरोडच्या दिशेने येत असताना नाशिक पुणे महामार्गावरील चेहेडी शिव येथील उड्डाणपुलाजवळ त्यांच्या कारच्या इंजिनने पेट घेतल्याचे महामार्गाकडेच्या दुकानदारांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ आरडाओरडा करून कुमार विधाणी यांच्या ही बाब लक्षात आणून दिली. कारचालक कुमार विधाणी यांनी कार तात्काळ महामार्गावर उभी केली आणि पत्नी व लहान मुलासह कारमधून वेळीच बाहेर पडले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. तोपर्यंत कार आगीच्या ज्वाळांनी वेढली गेली. भारतीय जनता युवा मोर्चा नाशिकरोड मंडळाचे अध्यक्ष संदीप शिरोळे, सरचिटणीस भूषण शहाणे, आव्हाड, जगताप आधी दुकानदारांनी कार वर माती आणि पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्यांना अपयश आल्याने त्यांनी नाशिकरोड येथील पालिकेच्या अग्निशमन केंद्राला या घटनेची माहिती दिली. काही वेळातच नाशिकरोड अग्निशमन दलाच्या जवानांसह अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला आणि कारला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळवले. याप्रसंगी नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर कडून नाशिकरोडच्या दिशेने येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुधीर डुंबरे , पोलीस हवालदार प्रकाश आरोटे, पोलीस कॉन्स्टेबल अरुण गाडेकर, पाचोरे आदींनी घटनास्थळी धाव घेत नाशिक-पुणे महामार्गावरील पेटलेली कार बाजूला घेऊन ठप्प पडलेली वाहतूक सुरळीत केली.