नाशिकरोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोड कडून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या अवजड मालट्रकखाली स्वतःला झोकून देत एका पंचवीस वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता नाशिक-पुणे महामार्गावरी गांधीनगर येथे घडली. मुकेशकुमार डुंगाराम चौधरी असे या घटनेतील आत्महत्या ग्रस्त युवकाचे नाव असून संपूर्ण अवजड मालट्रक( एमएच २५ टी २१४७) त्याच्या शरीरावरुन गेल्याने त्याच्या शरीराचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. महामार्गाच्या मधोमधच हा प्रकार घडल्याने अवघ्या काही मिनिटांतच नाशिकरोडकडून द्वारकेच्या दिशेने येणारी नाशिक-पुणे महामार्गाच्या बाजूवरील वाहतूक ठप्प झाली. उपनगर आणि शहर वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मात्र वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने रुग्णवाहिका अपघातस्थळी आणण्यात अडथळे निर्माण झाले. यावेळी बघ्यांनी देखील मोठी गर्दी केल्याने संपून महामार्ग ठप्प पडला. पालिसांनी महामार्गावर पडलेला मृतदेह रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात हलविला आणि त्यानंतर महामार्गावरील ठप्प पडलेली वाहतूक सुरळीत झाली. आत्महत्या केलेला युवक हा त्याच्या नातेवाईकासोबत महामार्गाच्या कडेला उभे असतांना त्यांच्यात वाद झाला. या वादात मुकेश कुमार याने सरळ महामार्गावरील मालट्रकच्या दिशेने धाव घेतली आणि स्वतःला मालट्रक खाली झोकून घेतल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिकांकडून मिळाल्याची माहिती अपघातस्थळी उपस्थित पोलिसांनी दिली. हा प्रकार उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. आत्महत्या केलेल्या युवकाचे नातेवाईक पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतरच मुकेशकुमारच्या आत्महत्येमागील खरे कारण समजू शकणार आहे.