नाशिक – दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत चालक ठार
नाशिक : औद्योगीक वसाहतीतील अशोकनगर पोलीस चौकीसमोर भरधाव दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एक चालक ठार झाला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. उमेश पोपटराव मेधने (५२ रा.जाधव संकुल,अशोकनगर) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. मेधने रविवारी सायंकाळच्या सुमारास आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. अशोक नगर पोलीस चौकीसमोरून भरधाव दोन दुचाकींमध्ये समोरासमोर धडक झाल्याने मेधणे जखमी झाले होते. कुटूंबियांनी त्यांना तात्काळ सिडकोतील गॅलेक्सी हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यु झाला. अधिक तपास हवालदार आहेर करीत आहेत.
सिडकोतील वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी केली आत्महत्या
नाशिक – सिडकोतील वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी आत्महत्या केली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. या आत्महत्येत एका २३ वर्षीय तरूणीचा समावेश असून दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पवननगर भागात गोविंद लोटन पाटील (५२ रा.सप्तशृंगी चौक,पवननगर) यांनी मंगळवारी आपल्या राहत्या घरातील हॉलमध्ये अज्ञात कारणातून पंख्यास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी विकास गुजर यांनी खबर दिली आहे. दुस-या घटना अंबड लिंक रोड भागात घडली. प्रियंका अनिल माळी (२३) या युवतीने दोन दिवसांपूर्वी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात रॅट किल नावाचे विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी तिला अशोका मेडिकव्हर रूग्णालयात दाखल केले होते. मंगळवारी उपचार सुरू असतांना तिचा मृत्यु झाला. याबाबत डॉ.मिलींद भदाणे यांनी खबर दिली आहे. दोन्ही घटनांप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक बनसोडे करीत आहेत.