नाशिक : नाशिक -पुणे महामार्गावरील चेहडी येथील दारणा पूलावर भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने शिक्षिकेचा अपघातात मृत्यु झाला. सेवा बजावून पती समवेत दुचाकीवर त्या घराकडे परत येत होत्या. लताबाई रामदास कचवे – मोरे (५४ रा.साईश्रध्दा रो बंगला,समर्थ नगर जत्रा हॉटेल मागे) असे अपघातात ठार झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे. लताबाई मोरे या सिन्नर तालूक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका असून त्या मंगळवारी सेवाबजावून सिन्नर कडून नाशिकच्या दिशेने प्रवास करीत असताना हा अपघात झाला. पती रामदास कचवे यांच्यासमवेत त्या डबलसीट प्रवास करीत असतांना चेहडी येथील दारणापूलावर अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीस धडक दिली. या अपघातात दांम्पत्य जखमी झाले. डोक्यास गंभीर दुखापत झालेल्या लताबाई यांना शिंदे टोल नाका रूग्णवाहिकेमधून तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता, उपचारापूर्वीच डॉ. बोरा यांनी त्यांना मृत घोषीत केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.