इगतपुरी – मुंबई आग्रा महामार्गावरून नाशिककडे जाणाऱ्या एका चारचाकी वाहनावर नाशिककडून येणारा ट्रक डिव्हाईडर तोडून जोरदार धडकला. भयानक पद्धतीने अचानक झालेल्या ह्या अपघातात चारचाकी वाहनातील ४ जण जागीच ठार झाले तर एक तरुण मृत्यूशी झुंझ देत आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातात हुजेफा एजाज उस्मानी (३१), रिझवान इक्बाल कुरैश (३०) , जुबेर इकबाल शेख (३०), सोहेल अखिल पठाण (२२) हे युवक जागीच ठार झाले आहे. तर नवील सय्यद हा पाचवा युवक मृत्यूशी झुंज देत आहे. युवकांच्या चारचाकीचा क्रमांक एमएच १५ – सीटी २४०४ हा आहे. तर कंटेनरचा क्रमांक एनएल ०१- एए १२४८ आहे.नाशिककडे जाणा-या चारचाकी वाहनांवर कंटेनर डिव्हाईडर तोडून जाेरदार धडकल्यामुळे हा अपघात झाला.
आज सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान झालेल्या अपघाताची माहिती समजताच नरेन्द्राचार्य संस्थान मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी गंभीर जखमींना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. अपघातातील जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकेच्या किमान ५ फेऱ्या झाल्या असून आणखी जखमी व्यक्ती असण्याची शक्यता आहे. अपघातात जागीच ठार झालेले ४ जण आणि चिंताग्रस्त गंभीर जखमी व्यक्ती नाशिक शहरातील आहे. वाडीवऱ्हे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मदतकार्य सुरू आहे. पावसामुळे मदतकार्यात अडचणी येत असून दोन्ही रस्त्यांच्या बाजूला बघ्यांची गर्दी वाढली आहे.