ट्रकखाली चिरडून महिलेचा मृत्यु
नाशिक : रस्त्यावर पडलेल्या महिलेवरून भरधाव मालट्रक चालून गेल्याने तिचा मृत्यु झाला. मृत महिला दुचाकीवरून रस्त्यावर पडली होती. मालट्रकचे चाक अंगावरून गेल्याने महिलेचा चेंदामेंदा होवून तिचा जागीच मृत्यु झाला. हा अपघात महामार्गावरली कुणाल हॉटेल समोर घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मालट्रक चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुवर्णा अशोक गायकवाड (४८ रा. मेनरोड गल्ली,आडगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी महिलेचे पती अशोक गायकवाड यांनी तक्रार दाखल केली आहे. गायकवाड दांम्पत्य सोमवारी (दि.२१) दुपारच्या सुमारास आडगाव येथून पंचवटीच्या दिशेने आपल्या दुचाकीवर डबलसिट प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. महामार्गावरून दांम्पत्य प्रवास करीत असतांना हॉटेल कुणाल समोर दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या सुवर्णा गायकवाड या तोल जावून दुचाकीवरून पडल्या होत्या. याचवेळी पाठीमागून भरधाव येणारा मालट्रक (एमएच १५ जीव्ही ५५९२) त्यांच्या अंगावर चालून गेला. या अपघातात महिला ट्रकच्या पाठीमागील चाकात आल्याने त्यांचा चेंदामेंदा होवून जागीच मृत्यु झाला. अधिक तपास उपनिरीक्षक कासर्ले करीत आहेत.
….
पोस्ट आॅफिसमधून संगणक चोरी
नाशिक : शहरातील पोस्टाच्या मुख्यकार्यालयातून संगणक चोरी झाल्याचा प्रकार सोमवारी (दि.२१) निदर्शनास आला. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ज्योतीकुमार तुळशीराम पवार (रा.टाकळी तपोवन लिंकरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बिडी भालेकर हायस्कुल समोरील पोस्टाच्या मुख्य कार्यालयात ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी उघड्या आॅफिस मध्ये प्रवेश करीत पीएलआय सेक्शन मध्ये ठेवलेले दोन मॉनिटर,एक सिपीयू,किबोर्ड आणि माऊस असा सुमारे ९ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.
…..