कारच्या धडकेने महिलेचा मृत्यू
नाशिक : भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार झाल्याची घटना शनिवारी (दि.२०) नाशिक-पुणे महामार्गावरील चेहडीशिव ब्रिजजवळ घडली. याप्रकरणी विजय सुरेश हरळे यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कमल सुरेश हरळे (रा.वडगाव पिंगळा, ता. सिन्नर, जि. नाशिक) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सुरेश हरळे दुचाकी (एमएच १५, एव्ही ६४७)वरुन नाशिक-पुणे महामार्गावरुन वडगाव पिंगळा येथे येत होते. त्यावेळी त्यांच्यासमवेत पत्नी कमल हरळे दुचाकीवर पाठीमागे बसल्या होत्या. दुचाकी चेहडीशिव ब्रिजजवळ आली असता पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या कारने हरळे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात कमल हरळे यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालक कारसह फरार झाला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एम.डी. परदेशी करीत आहेत.
गळफास घेत तरुणाची आत्महत्या
नाशिक : राहत्या घरात तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.२०)अश्वमेध नगर, पेठ रोड, नाशिक येथे घडली. आत्महत्या करण्यामागचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सुजित शिवाजी बर्डे (वय २३) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सुजित बर्डे याने घरात कोणी नसताना गळफास घेत आत्महत्या केली. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यास उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी करत त्यास मृत घोषित केले. पुढील तपास पोलीस हवालदार भोज करत आहेत.