भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत पादचारी ठार; दुचाकीस्वाराविरूध्द गुन्हा दाखल
नाशिक : भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत पादचारी ठार झाला. हा अपघात जेलरोड भागात झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू नानासाहेब पगारे (रा.महालक्ष्मीनगर,दसक) असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. पगारे गेल्या शनिवारी (दि.१३) जेलरोड भागातील हॉटेल आठवण समोर रस्ता ओलांडत असतांना हा अपघात झाला. नांदूरनाक्याकडून भरधाव येणा-या एमएच १५ एचजे २२१२ या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली होती. या अपघातात पगारे गंभीर जखमी झाले होते. त्यात त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी मुलगा रोहित पगारे याने दिलेल्या तक्रारीवरून सदर दुचाकीवरील चालकाविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार गिते करीत आहेत.
प्रभातनगर भागात आर्थिक देवाण घेवाणीतून त्रिकुटाने केली बेदम मारहाण
नाशिक : आर्थिक देवाण घेवाणीतून त्रिकुटाने एकास बेदम मारहाण केल्याची घटना प्रभातनगर भागात घडली. याघटनेत लोखंडी सळईचा वापर करण्यात आल्याने तरूण जखमी झाला असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिंकेश सोळंकी,सोनू कोराळे व नागरे अशी तरूणास मारहाण करणा-या संशयीतांची नावे आहे. याप्रकरणी योगेश सुरेश पाथर्वट (३० रा.बिडी कामगारनगर,अमृतधाम) या तरूणाने तक्रार दाखल केली आहे. पाथर्वट हा गुरूवारी (दि.१८) रात्री प्रभातनगर भागात गेला असता ही घटना घडली. वडाचे झाडामागील गार्डन जवळ संशयीतांनी त्यास गाठून पैश्यांच्या देवाण घेवाणीतून वाद घालत त्यास शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी संशयीतांपैकी एकाने त्याच्या डोक्यात लोखंडी सळई मारल्याने तो जखमी झाला असून अधिक तपास जमादार वाघ करीत आहेत.