नाशिक – शहर व परिसरात वेगवेगळया ठिकाणी झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यु
नाशिक : शहर व परिसरात वेगवेगळया ठिकाणी झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यु झाला. त्यात एका ७३ वर्षीय वृध्दाचा समावेश आहे. याप्रकरणी मुंबईनाका आणि आडगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. काठेगल्लीतील जयराम तुकाराम काठे (७३ रा.सावतामाळी चौक) हे शुक्रवारी (दि.२९) दुपारच्या सुमारास काठेगल्लीतून शालिमारच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना द्वारका सर्कल भागात दोन दुचाकींमध्ये अपघात झाला या घटनेत काठे रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने मुंबईनाका येथील नारायणी रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार निसार शेख करीत आहेत. दुसरा अपघात महामार्गावरील आडगाव ट्रक टर्मिनल भागात झाला. या अपघातात शुभम साहेबराव जगताप (२१ रा.चिंचखेड ता.दिडोंरी) या तरूणाचा मृत्यु झाला. जगताप गुरूवारी (दि.२८) ओझरकडून नाशिकच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. ट्रक टर्मिनल परिसरात पाठीमागून भरधाव येणा-या दुचाकीस मालट्रकने धडक दिल्याने जगताप याचा मृत्यु झाला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.
चौकमंडईत तडीपार जेरबंद
नाशिक : हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली असतांना राजरोसपणे शहरात वावरणा-या तडीपारास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई जुने नाशिक भागातील चौकमंडई येथे करण्यात आली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुजफ्फर उर्फ तडक महेमुद शहा (३० रा.मोठा राजवाडा) असे अटक करण्यात आलेल्या तडिपार गुंडाचे नाव आहे. मुजफ्फर शहा याच्या वाढत्या गुन्हेगारी पार्श्वभूमिवर शहर पोलीसांनी त्यास जिह्यातून हद्दपार केले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. भद्रकाली पोलीस त्याच्या मागावर असतांनाच तो शुक्रवारी (दि.२९) दुपारच्या सुमारास चौकमंडई परिसरात आला असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार सापळा लावून त्यास बेड्या ठोकण्यात आल्या असून याप्रकरणी अंमलदार जितेंद्र पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार निकम करीत आहेत.