नाशिक : सिडकोतील वेगवेगळया भागात झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यु झाला. त्यात धावत्या स्कुटरचे सायलेन्सर तुटून चाकात अडकल्याने एका वृध्दाचा तर दुस-या घटनेत दुभाजकावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यु झाला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात वेगवेगळे अपघाताचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश मुरलीधर वल्टे (६८ रा.बजरंगवाडी,द्वारका) व सम्राट चिदानंद मोरे (४० रा.गौरव सिध्दी शुभम पार्क उत्तमनगर) अशी वेगवेगळया ठिकाणी झालेल्या अपघातामध्ये मृत्यु झालेल्या दुचाकीस्वारांचे नाव आहे. सुरेश वल्टे सोमवारी (दि.२५) सायंकाळच्या सुमारास आपल्या स्कुटरवर (एमएच १५ एडी ४६२२) वरून प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. अशोकराव तिडके चौकाकडून ते सपना टॉकीजच्या दिशेने प्रवास करीत असतांना श्रीराम डेअरी समोर भरधाव दुचाकी खड्यात आदळली. या घटनेत स्कुटरचे सायलेंन्सर तुटून चाकात अडकल्याने ते जमिनीवर पडून गंभीर जखमी झाले होते. त्यात त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी हवालदार शेख यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार टोपले करीत आहेत. दुसरी घटना पेलीकन पार्क परिसरात घडली. सम्राट मोरे गेल्या शुक्रवारी (दि.८) रात्री पेलीकन पार्क कडून गणेश चौकाच्या दिशेने आपल्या दुचाकीवर एमएच १५ सीआर ४९८१ प्रवास करीत असतांना अपघात झाला होता. मंगलमुर्ती स्टोरच्या बाजूच्या विविध विकास ग्राऊंड समोर भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळल्याने ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी हवालदार शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.