दोन दुचाकींमध्ये झालेल्या धडकेत महिलेचा मृत्यु
नाशिक : दोन दुचाकींमध्ये झालेल्या धडकेत एका मोटारसायकलवर पाठीमागे बसलेल्या महिलेचा मृत्यु झाला. हा अपघात गंगापूररोडवरील मॅरेथॉन चौक भागात झाला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. विमल यादव महाले (रा.काळमुसते ता. त्र्यंबकेश्वर) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी प्रकाश परशराम लाहरे (रा.अमेटी – अमालोण ता. पेठ) यांनी तक्रार दाखल केली आहे. लाहरे व मृत महिला महाले हे बहिण भाऊ असून दोघे सोमवारी (दि.२५) दुपारच्या सुमारास गंगापूररोडने आपल्या दुचाकीवर एमएच १५ सीएच ८०३२ गावी जात असतांना हा अपघात झाला. मॅरेथॉन चौकातून बहिणभाऊ दुचाकीवर प्रवास करीत असतांना काही अंतरावरच पाठीमागून भरधाव आलेल्या मोटारसायकलने दुचाकीस जोरदार धडक दिली. या अपघातात बहिण भाऊ रस्त्यावर पडल्याने जखमी झाले. तर विमल महाले यांच्या डोक्यास वर्मी मार लागल्याने त्यांचा मृत्यु झाला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक भोये करीत आहेत.
भरधाव दुचाकी घसरल्याने १८ वर्षीय तरूणाचा मृत्यु
नाशिक : भरधाव दुचाकी घसरल्याने १८ वर्षीय तरूणाचा मृत्यु झाला. हा अपघात औद्योगीक वसाहतीतील अशोकनगर भागात झाला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. आदित्य रविंद्र मोरे (रा.कार्बन नाका,शिवाजीनगर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. आदित्य मोरे रविवारी (दि.२४) अशोकनगर कडून शिवाजीनगरच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. अशोक नगर बस थांबा भागातील अंबिका स्विटस समोर भरधाव दुचाकी घसरल्याने तो गंभीर जखमी झाला होता. वडिल रविंद्र मोरे यांनी त्यास तात्काळ सार्थक हॉस्पिटल येथे प्रथोमचार करून अधिक उपचारार्थ अशोका मेडिकेअर हॉस्पिटल येथे दाखल केले असता सोमवारी (दि.२५) उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यु झाला. अधिक तपास पोलीस नाईक आहेर करीत आहेत.