नाशिक – पाय घसरून पडल्याने ७८ वर्षीय वृध्देचा मृत्यु
नाशिक : राहत्या घरात पाय घसरून पडल्याने ७८ वर्षीय वृध्देचा मृत्यु झाला. ही घटना सिडकोतील उत्तमनगर भागात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सविता सोन्याबापू खंडीझोड (रा.गौरी शांती अपा.शुभम पार्क) असे मृत वृध्देचे नाव आहे. सविता खंडीझोड या गुरूवारी (दि.१४) सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात पाय घसरून पडल्या होत्या. या घटनेत त्यांच्या डोक्यास वर्मी मार लागल्याने कुटूंबियांनी त्यांना वोक्हार्ट रूग्णालयात दाखल केले असता डॉ. बोरसे यांनी त्यांना मृत घोषीत केले. अधिक तपास बनतोडे करीत आहेत.
हातातील मोबाईल दुचाकीस्वाराने हिसकावून नेला
नाशिक : रस्त्याच्या कडेला मोबाईलवर बोलणा-या तरूणाच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वाराने हिसकावून नेल्याची घटना जॉगिंग ट्रॅक भागात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश शिवाजी धामणे (रा.चार्वाक चौक) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. धामणे गुरूवारी (दि.१४) सायंकाळच्या सुमारास इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकच्या प्रवेशद्वाराजवळ रस्त्याच्या कडेला उभे राहून मोबाईलवर बोलत असतांना ही घटना घडली. एमएच १५ ६५५५ या दुचाकीवर आलेल्या भामट्याने त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून इंदिरानगर बोगद्याच्या दिशेने पोबारा केला. दरम्यान धामणे यांनी संशयीताचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र तो मिळून आला नाही. अधिक तपास उपनिरीक्षक बारेला करीत आहेत.