नाशिक – भारत गॅस कंपनीचा टँकर गुरुवारी पहाटे द्वारका सर्कल येथे पलटी झाल्यानंतर दुपार पर्यंत क्रेनद्वारे टॅकर उचलण्यात आले. या टँकरमुळे व्दारका परिसरात वाहतुक कोंडी झाली होती. घटनेची माहिती कळताच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तत्काळ घटनास्थळी पोहचल्याने मोठा अनर्थ टळला. खबरदारीमुळे गॅस गळती टळली.
हा टँकर पहाटे पाच वाजेच्या सुमारास मुंबईहून एलपीजी गॅस भरलेला टँकर क्रमांक एमएच ४३ बीजी. ०६९९९ हा द्वारका चौकातून युटर्न घेऊन सिन्नरकडे जात असताना पलटी झाला. या घटनेची माहिती स्थानिकांनी भद्रकाली पोलीस स्थानकाला कळवली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाही ही माहिती देण्यात आली. त्यानंतर मदत कार्य सुरु झाले. टँकरमध्ये एलपीजी गॅस असल्याने गळती होऊन मोठया दुर्घटनेचा धोका होता. त्यामुळे सिन्नर प्लांटचे सुरक्षा अधिकारी यांना बोलविण्यात आले. नाशिक तहसीलदार, भद्रकाली पोलीस स्टेशनचे निरीक्षक आणि महानगरपालिकेचे अग्निशमन दल जागेवर हजर होत. यावेळी सुरक्षेच्या उपाययोजना पूर्ण करण्यात आल्यानंतर क्रेनद्वारे टँकर उचलण्यात आला. दहा तासाच्या प्रयत्नानंतर दुपारी तीन वाजेच्या आसपास हा टॅकर उचलण्यात यश आले.