नाशिक : भरधाव मालट्रकच्या धडकेत २४ वर्षीय दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात महामार्गावरील द्वारका परिसरात उड्डाणपुलावर झाला. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरूध्द अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
अविनाश राजेंद्र सुर्यवंशी (रा.गलवाडा जि.जळगाव,हल्ली दत्तचौक सिडको) असे अपघातात ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे. अविनाश सुर्यवंशी रविवारी (दि.१०) द्वारका सर्कल कडून आपल्या दुचाकीवर एमएच १५ डीजी २२३९ जात असतांना हा अपघात झाला. उड्डाणपूलावरून सिडकोच्या दिशेने प्रवास करीत असतांना जॉन डिअर शोरूम समोर पाठीमागून भरधाव येणा-या मालट्रकने एमपी ०९ एचएच ८२६७ दुचाकीस धडक दिली. या अपघातात अविनाश सुर्यवंशी गंभीर जखमी झाल्याने १०८ अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. याप्रकरणी संजय कुवर (रा.ज्ञानेश्वरनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रक चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार भिल करीत आहेत.