लासलगाव – लासलगाव विंचूर रोड वरील मंजुळा पॅलेस समोर ॲपे रिक्षा आणि हायवा याच्यामध्ये झालेल्या जोरदार धडकेत रिक्षा मधील पाच जण ठार झाल्याची घटना सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेत लोणी ता राहता येथील दोन जणांचा समावेश आहे. याबाबत अधिक माहिती अशी की शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास लासलगावहून विंचूरच्या दिशेने निघालेली ॲपे रिक्षा क्रमांक MH.15.Y.4461 मध्ये रिक्षा चालकासह पाच जण प्रवास करत असताना विंचूरहून लासलगावच्या दिशेने निघालेल्या हायवाने जोरदार धडक दिल्याने जागेवरच पाच जणांचा बळी गेल्याची दुर्दैवी घटना घडली. मृतांमध्ये सुहास मनोहर निकाळे (वय ४०) विंचूर, रिक्षा चालक, विठ्ठल बाजीराव भापकर (वय ६५) रा. लोणी प्रवरा, भाऊसाहेब बाळासाहेब नागरे (वय ६०) लोणी प्रवरा, किसनदास बैरागी (वय ६०) धारणगाव खडक,निफाड, रतन गांगुर्डे (वय ४०) इंदीरा नगर विंचूर यांचा समावेश आहे.
यातील दोन प्रवाशी लोणी प्रवरा येथून लासलगाव जवळील पिंपळगाव नजीक येथे भाऊसाहेब पठारे यांचे कडे अंत विधीसाठी सकाळी आले होते. अंत्यविधी कार्यक्रम आटपून आपल्या गावी जाण्यासाठी ते विंचूरला रिक्षाने जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. अपघाताचे वृत्त समजताच लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राहुल वाघ हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. अपघात ग्रस्त पाचही जणांना लासलगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ अमित घोंगडे यांनी तपासणी केली असता चार जण मृतावस्थेत आढळून आले तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. अपघाताचे वृत्त समजताच लासलगाव डॉक्टर असोसिएशनचे सदस्य डॉक्टर सुजित गुंजाळ आणि डॉक्टर विलास कांगणे यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन उपचारासाठी मदत केली.