नाशिक – इगतपुरी तालुक्यातील मुरंबी येथील दोन सख्खे भाऊ नाशिकच्या पांडवलेणीजवळ झालेल्या अपघातात जागीच ठार झाले आहेत. व्यसनाधीन झालेल्या लहान भावाची दारू सोडवण्यासाठी जाऊन परतत असताना अज्ञात वाहनाने चिरडल्याने दोघांचा हृदयद्रावक मृत्यू झाला. या घटनेमुळे इगतपुरी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. मुरंबी, ता. इगतपुरी येथील गोरख लक्ष्मण जाधव वय ३५ हे त्यांचा लहान भाऊ सोमनाथ लक्ष्मण जाधव वय २५ दारू पीत असल्याने व्यसनाधीन झाला होता. त्याची दारू सोडवण्यासाठी आज सकाळी दोघे वणी येथे गेले होते. तिकडून मुरंबीकडे त्यांची दुचाकी एम एच १५ डी पी ४२१४ घेऊन परतत होते. आज सकाळी ११ वाजेच्या दरम्यान मुंबई आग्रा महामार्गावरील पांडवलेणीसमोर उड्डाण पुलावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये दोघांना वाहनाने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दोघांच्या मागे आई वडील, दोघांच्या पत्नी, दोघांनाही दोन मुली, बहीण असा परिवार आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक उत्तम सोनवणे करीत आहेत. दरम्यान ह्या घटनेमुळे इगतपुरी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.