नाशिक पुणे मार्गावर टेम्पोच्या धडकेत २३ वर्षीय दुचाकीस्वार ठार
नाशिक : भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत २३ वर्षीय दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात नाशिक पुणे मार्गावरील चेहडी नाका भागात झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमंत राजेश कुमावत (रा.दारणा संकुल,पळसे) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. हेमंत कुमावत मंगळवारी (दि.१४) दुपारच्या सुमारास नाशिक पुणा मार्गावरून दुचाकीने (एमएच १५ एचपी २५८५) प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. चेहडी नाका भागातील जुना जकात नाका येथे पाठीमागून भरधाव येणा-या टाटा टरबो एमएच ४२ बी ८९०५ या टेम्पोने दुचाकीस धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या कुमावत याचा मृत्यु झाला. मद्यधुंद टेम्पो चालकाने आपले वाहन रस्त्याच्या परिस्थीतीकडे दुर्लक्ष करीत दामटल्याने हा अपघात झाला. याप्रकरणी शुभम कुमावत याने दिलेल्या तक्रारीवरून टेम्पो चालक विजय मारूती भागवत (रा.पांढरेवाडी,दौंड जि.पुणे) याच्याविरूध्द नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक परदेशी करीत आहेत.
भद्रकालीत दोघे तडीपार जेरबंद
नाशिक : हद्दपार असतांना शहरात वावरणा-या तडिपारांची पोलीसांनी शोध मोहिम हाती घेतली असून सोमवारी (दि.१४) जुने नाशिक परिसरात राजरोसपणे पोलीसांच्या नाकावर टिच्चून फिरणा-या दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात वेगवेळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शुभम उर्फ शंभू गोरख जाधव (२३ रा.दत्तात्रेय अपा.तांबटलेन) आणि ऋषभ उर्फ डुब-या दिनेश लोखंडे (२१ रा.भगवतीनगर,कोळीवाडा) अशी अटक केलेल्या तडीपारांची नावे आहेत. गुन्हेगारी कारवायांमुळे शहर पोलीसांनी अनुक्रमे दोन आणि एक वर्षासाठी शहर आणि जिह्यातून हद्दपार केले आहे. मात्र त्यांचा वावर शहरातच असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस त्याच्या मागावर होते. गेल्या काही दिवसात तडिपारांचा शहरातील वावर चर्चेत आला असून पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी तडिपारांची शोध मोहिम हाती घेण्याचे आदेश जारी केले आहे. या पार्श्वभूमिवर भद्रकाली पोलीसांनी ही कारवाई केली असून शंभू जाधव यास साक्षी गणपती जवळील अॅक्सीस बँकेच्या एटीएम भागात बेड्या ठोकण्यात आल्या तर डुब-या लोखंडे यास नानावलीतील फेमस बेकरी परिसरात सापळा लावून जेरबंद करण्यात आले आहे. पोलीस कर्मचारी जितेंद्र पवार आणि संजय पोटींदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास पोलीस नाईक म्हसदे आणि हवालदार पाटील करीत आहेत.