भरधाव अॅटोरिक्षाने दिलेल्या धडकेत ६३ वर्षीय पादचारी वृध्द ठार
नाशिक – भरधाव अॅटोरिक्षाने दिलेल्या धडकेत ६३ वर्षीय पादचारी वृध्द ठार झाला. हा अपघात देवळाली गावातील राजवाडा कॉर्नर भागात झाला असून, रिक्षाचालक आपल्या वाहनासह पसार झाला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबादास किसन पाळदे (६३ रा.दत्तमंदिर जवळ बेलतगव्हाण) असे मृत ज्येष्ठाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार पाळदे २५ ऑगष्ट रोजी देवळाली गावातील वखारी जवळून पायी जात असतांना हा अपघात झाला होता. राजवाडा कॉर्नर येथे भरधाव अज्ञात अॅटोरिक्षाने त्यांना धडक दिली होती. या घटनेत ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. अपघातानंतर रिक्षाचालक आपल्या वाहनासह पसार झाला असून याप्रकरणी भाऊ देविदास पाळदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक विंचू करीत आहेत.
तीन मोबाईल हातोहात लांबविले….
नाशिक – गणपती खरेदीच्या गर्दीत चोरट्यांनी संधी साधली असून, सिडकोतील उपेंद्रनगर भागात भाविकांच्या मोबाईलवर डल्ला मारण्यात आला आहे. विशेष म्हणजे धक्का मारून चोरट्यांनी मोबाईल हातोहात लांबविले असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राकेश पुंडलिक टेमकर (३५, मोढेवाडी गौळाणे रोड, पाथर्डी गाव) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. टेमकर कुटूंबिय शुक्रवारी (दि.१०) गणपती खरेदीसाठी सिडकोतील उपेंद्रनगर भागात गेले होते. गर्दीत खरेदी करीत असतांना चोरट्यांनी धक्का मारून टेमकर यांच्यासह अन्य दोघांचे असे सुमारे ५० हजार ९९७ रूपये किमतीचे तीन मोबाईल हातोहात लांबविले. अधिक तपास पोलीस नाईक पगारे करीत आहेत.