नाशिक : भरधाव मोटारसायकल बैलावर जावून आदळल्याने झालेल्या अपघातात बैलाचे शिंग लागून दुचाकीस्वाराचा मृत्यु झाला. ही घटना नाशिक त्र्यंबक मार्गावरील तळेगाव फाटा परिसरात झाला. याप्रकरणी त्र्यंबक पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार गुलाब बन्सी गायकवाड (५० रा.भोसला स्कूल मागे संतकबीरनगर,) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. गायकवाड शुक्रवारी (दि.१०) मित्र श्रावण काळे यांना सोबत घेवून दुचाकीवर त्र्यंबकेश्वर येथे गेले होते. दुपारच्या सुमारास दोघे मित्र डबलसिट परतीच्या प्रवासास लागले असता ही घटना घडली. तळेगाव फाटा परिसरात अचानक रस्त्याच्या कडेला चरणारा बैल रस्त्यावर आल्याने हा अपघात झाला. भरधाव दुचाकी बैलावर जावून आदळली. या अपघातात पाठीमागे बसलेले काळे मागच्या मागे पडले तर गायकवाड थेट बैलाच्या डोक्यावर जावून पडले. या अपघातात बैलाचे शिंग त्यांच्या मानेत घुसले होते. मित्र काळे आणि मुलगा रोशन गायकवाड यांनी त्यांना तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले.