नाशिक : भरधाव टेम्पोने मोपेडला धडक दिल्याने दुचाकीवर पाठीमागे बसलेला १८ वर्षीय तरूण ठार झाला. हा अपघात नाशिक पुणे मार्गावरील पळसे गाव येथे झाला. या अपघातात दुचाकीचालकही जखमी झाला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात टेम्पो चालका विरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवाज जहीर खान (१८) असे अपघातात ठार झालेल्या तरूणाचे नाव असून या अपघातात फैईज फिरोज मेमन (१८ दोघे रा.खडकाळी,त्र्यंबक पोलीस चौकी समोर) हा युवक जखमी झाला आहे. याप्रकरणी खालीद खान यांनी तक्रार दाखल केली आहे. फैईज मेमन आणि नवाज खान हे दोघे चुलत भाऊ गुरूवारी (दि.९) आपल्या मोपेड दुचाकीवर नाशिक पुणा मार्गावरून प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. पळसे गावाच्या कमानी जवळ पाठीमागून भरधाव आलेल्या आयशर टेम्पो एमएच १२ एचडी ३२६१ दुचाकीस धडक दिली. या अपघातात दोघे भाऊ जखमी झाले होते.त्यातील नवाज खान याचा मृत्यु झाला असून टेम्पो चालक आपल्या वाहनासह पसार झाला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक परदेशी करीत आहेत.