हनुमानवाडीत भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत वृध्द ठार
नाशिक : भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पादचारी वृध्द ठार झाला. हा अपघात हनुमानवाडीत झाला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. बाळू रंगनाथ गांगुर्डे (६० रा.श्रीखंडे चाळ,हनुमानवाडी) असे अपघातात ठार झालेल्या वृध्दाचे नाव आहे. गांगुर्डे मंगळवारी (दि.७) ड्रिम कॅसल सिग्नलकडून आपल्या घराकडे पायी जात असतांना हा अपघात झाला. सोमेश्वर किराणा स्पेअर्स समोर भरधाव अज्ञात वाहनांनी त्यांना धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यु झाला. अधिक तपास हवालदार माळोदे करीत आहेत.
पंचवटीत तडीपार जेरबंद
नाशिक : शहर आणि जिह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केलेले असतांना शहरात वावर ठेवणा-या तडीपारास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयीत पेठरोडवरील मार्केट यार्ड भागात मिळून आला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोकुळ मधुकर येलमामे (रा.तुळजाभवानी नगर,पंचवटी) असे अटक केलेल्या संशयीत तडीपाराचे नाव आहे. येलमामे याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे त्यास शहर पोलीसांनी दोन वर्षासाठी हद्दपार कारवाई केली आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीस त्याच्या मागावर असतांनाच मंगळवारी (दि.७) तो शरदचंद्र पवार मार्केट यार्डा मागे असल्याची माहिती मिळाल्याने पोलीसांनी धाव घेत सापळा रचून त्यास जेरबद केले. याप्रकरणी पोलीस शिपाई दिपक नाईक यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार काकड करीत आहेत.