कारच्या धडकेत बेलतगव्हाण येथील महिलेचा मृत्यु
नाशिक : भरधाव कारने धडक दिल्याने बेलतगव्हाण येथील अॅक्टीव्हास्वार महिलेचा मृत्यु झाला. हा अपघात जयभवानीरोड भागात झाला. या अपघातात मृत महिलेची मैत्रीणही जखमी झाली असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात कारचालकाविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेखा दिलीप शिंदे (३८ रा.माऊलीनगर,बेलतगव्हाण) असे मृत दुचाकीस्वार महिलेचे नाव आहे. सुरेखा शिंदे व गायत्री गंधारे या दोन मैत्रीणी रविवारी (दि.५) जयभवानी रोड मार्गे बेलतगव्हाणच्या दिशेने आपल्या अॅक्टीव्हा एमएच १५ जीसी ५६३६ दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. फर्नांडीस वाडी भागातील ग्राऊंडजवळून दोघी मैत्रीणी दुचाकीवर प्रवास करीत असतांना पाठीमागून भरधाव आलेल्या एमएच ०२ सीबी ९३२१ या कारने दुचाकीस धडक दिली. या अपघातात शिंदे यांचा मृत्यु झाला तर गायत्री गंधारे या जखमी झाला असून याप्रकरणी दिनेश धुर्जंड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात कारचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जमादार परदेशी करीत आहेत.
ट्रकमध्ये झोपलेल्या परप्रांतीय मुलास पळविले
नाशिक : बहिणीच्या पतीसमेवत आलेल्या परप्रांतीय १६ वर्षीय मुलास कोणी तरी पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. सदर मुलगा औद्योगीक वसाहतीत आपल्या मेव्हण्याच्या ट्रकमध्ये झोपलेला होता. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामकिशन रामेश्वर प्रसाद बघेल (रा.मथुरा, उत्तरप्रदेश) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. रामकिशन बघेल रविवारी (दि.५) सकाळी शहरात दाखल झाले होते. शालक मोनू (१६) यास सोबत घेवून ते आले होते. अंबड औद्योगीक वसाहतीतील भोर टेकट्रेड या कारखान्याचा माल खाली करायचा असल्याने त्यांनी आपला ट्रक (एमपी ०९ एचएच ८५०२) कंपनीसमोर पार्क केला असता ही घटना घडली. माल खाली करण्याबाबत चौकशी करण्यासाठी रामकिशन बघेल हे कंपनीत गेले असता ट्रक मध्ये झोपलेल्या मोनू यास कोणीतरी पळवून नेले. सर्वत्र शोध घेवूनही तो मिळून न आल्याने पोलीस दप्तरी अपहरणाचा गुन्हा दाखल करणयत आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.
…..