नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहर व परिसरात अपघातांची मालिका सुरू असून रविवारी (दि. १४) वेगवेगळया अपघातात भरधाव वाहनांनी दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. त्यात २४ वर्षीय महिलेसह साठ वर्षीय वृध्दाचा समावेश आहे. याप्रकरणी गंगापूर व पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
संत कबीर नगर येथील अर्चना संतोष आठवणे (२४ रा. मांगीर बाबा चौक) ही महिला रविवारी सायंकाळच्या सुमारास समर्थ नगर कडून जेहान सर्कलच्या दिशने पायी जात असतांना लींबूज हॉटेल समोरील भोसलाच्या गेट समोर तिला भरधाव एमएच ४१ हीही ७७७६ या दुचाकीने धडक दिली. या अपघातात महिला गंभीर जखमी झाल्याने तिला समाजसेवक राहूल भुजबळ यांनी तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार आहिरे करीत आहेत.
दुसरा अपघात तारवाला लिंकरोड भागात घडला. दिनकर पांडूरंग थेटे (६० रा.उदयनगर,मखमलाबाद) हे शनिवारी (दि.१३) रात्री तारवाला लिंकरोडने आपल्या स्कुटीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. अमृतधामच्या दिशेने ते प्रवास करीत असतांना अचानक दुचाकी घसरल्याने ते पडले होते. या घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाल्याने राहूल झोरे यांनी तात्काळ नामको हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉ. सुनिता वाघ यांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार कोरडे करीत आहेत.