नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– अपघाताचा जाब विचारल्याने संतप्त ट्रकचालकाने शिवीगाळ करीत कारचालकास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार महामार्गावरील उड्डाण पुलावर घडला. या घटनेत कारचे मोठे नुकसान झाले असून याप्रकरणी पसार झालेल्या कारचालकाविरोधात आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपळगाव (ब.) ता. निफाड येथील ऋतिक संदिप शिंदे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शिंदे शनिवारी (दि.१६) आपल्या आईस सोबत घेवून शहरात आले होते. रात्री दहाच्या सुमारास मायलेक एमएच १५ एचक्यू ३९८७ या अल्टो कारमधून परतीच्या प्रवासास लागले असता हा अपघात झाला. बळी मंदिर परिसरातील रॅम्पपासून काही अंतरावरील उड्डाणपूलावर पाठीमागून भरधाव आलेल्या एमपी ०९ एचपी ७६२५ या आयशर ट्रकने कारच्या ड्राईव्हर साईडला धडक दिली.
या अपघातात कारचे मोठे नुकसान झाल्याने शिंदे यांनी ट्रक चालकास जाब विचारला असता संशयिताने शिवीगाळ करीत व अंगावर धावून येत तुम्हाला चाकूने मारून टाकतो असा दम दिला. अधिक तपास हवालदार निंबाळकर करीत आहेत.
घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ५० हजाराच्या ऐवजावर डल्ला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नवीन आडगाव नाका भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ५० हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह चांदीचे देव आणि मनगटी घड्याळांचा समावेश आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलीप विष्णू भांडगे (रा.ड विंग सम्राट वृंदावन नवीन आडगावनाका) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. भांडगे कुटूंबिय १२ ते १७ ऑगष्ट दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे लॅचलॉक तोडून देवघरातील चांदीचे देव व बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड आणि मनगटी घड्याळे असा सुमारे ५० हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत.