इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जयपूर – अजमेर महामार्गावर सीएनजी अन एलपीजी टँकरची धडक होऊन भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत ४० हून अधिक गाड्यांनी पेट घेतला तर ८ जणांचा होरपळून मृत्यू झाला तर ४१ जण जखमी आहे. हा अपघात इतका भीषण होता की हळूहळू ४० वाहनांचा त्याला फटका बसला. पहाटे ५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
या घटनेनंतर राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी अपघातस्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या भीषण अपघातामुळे ५०० मीटरपर्यंत केमिकल पसरले. त्यामुळे अनेक वाहनांनी पेट घेतला. यात एक कारखानाही जळाला. केमिकल व गॅसमुळे आग विझवण्यात अनेक अडचणी आल्या. या अपघातात ४१ हून अधिक जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एक टॅँकर वळण घेत असताना समोरुन दुसरा टँकर आला आणि दोघांची जोरदार धडक झाली. याचवेळी मोठा आवाज झाला. त्यानंतर एकामागून एक अनेक वाहने आदळल्याने आगीच्या घटना घडल्या. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.