नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भरधाव अज्ञात चारचाकीने दिलेल्या धडकेत ५२ वर्षीय दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात पाथर्डी फाटा ते विहीतगाव दरम्यान झाला असून या घटनेत चारचाकीचे चाक दुचाकीस्वाराच्या डोक्यावरून गेल्याने सदर इसमाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हरिहर प्रसाद गोविंद सिंह (रा.विद्या विहार सोसा.जयभवानीरोड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. हरिहर सिंह मंगळवारी (दि.२६) पाथर्डी फाटा भागात गेले होते.
सायंकाळच्या सुमारास ते अॅक्टीव्हावर ( एमएच १५ सी डब्ल्यू ३३३०) परतीचा प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. वडनेर रोडने ते विहीतगावच्या दिशेने जात असतांना अज्ञात चारचाकीने दुचाकीस धडक दिली. या अपघातात रस्त्यावर पडलेल्या सिंह यांच्या डोक्यावरून अपघातग्रस्त वाहनाचे चाक गेल्याने त्यांचा चेंदामेंदा झाला होता. मित्र कृष्णा अवतार छत्रपाल सिंह यांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास पोलीस नाईक बोडके करीत आहेत.