अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार
नाशिक : भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ४१ वर्षीय पादचारी ठार झाला. हा अपघात महार्मावरील इंदिरानगर बोगदा ते साईनाथ चौफुली दरम्यानच्या सर्व्हीस रोडवर झाला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अशोक सुरेश भालेराव (४६ रा.वर्कशॉप पोस्ट ऑफिस जवळ,भगूर रोड दे.कॅम्प) असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. भालेराव गुरूवारी (दि.२) इंदिरानगर बोगद्याकडून साईनाथ चौफुलीच्या दिशेने पायी जात असतांना हा अपघात झाला. महामार्गाच्या सर्व्हीस रोडने पायी जात असतांना जॉगिंग ट्रॅकला लागून असलेल्या हॉटेल ऑस्पेशिया नजीक पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने भालेराव यांना जोरदार धडक दिली. जखमी अवस्थेत ते मिळून आल्याने पोलीसांनी त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी प्रविणकुमार भालेराव यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात वाहनचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक श्रीवंत करीत आहेत.
टागोरनगरला वृद्दाची आत्महत्या
नाशिक : टागोरनगर भागात राहणा-या ७७ वर्षीय वृद्दाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. सदर इसमाच्या आत्महत्याचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सुधीर आनंद सादळे (रा.ड्रिम नेस्ट सोसा.रियान स्कूल जवळ) असे आत्महत्या केलेल्या वृध्दाचे नाव आहे. सादळे यांनी शुक्रवारी (दि.३) आपल्या राहत्या घरी अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यु झाला. अधिक तपास हवालदार ताजणे करीत आहेत.